अर्जुन तेंडुलकर गोवा संघात दाखल | पुढारी

अर्जुन तेंडुलकर गोवा संघात दाखल

पणजी : पुढारी वृत्तसेवा भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर 2022-23 च्या देशांतर्गत हंगामात गोव्याकडून खेळणार आहे. याची पुष्टी गुरुवारी झाली. हा डावखुरा वेगवान गोलंदाज गोव्याच्या सराव सत्रात शुक्रवारी सहभागी होणार आहे.

याबाबत बोलताना गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटीलकर म्हणाले की, गोव्याच्या संघाला डावखुरा वेगवान गोलंदाज हवा होता. यासाठी अर्जुनने स्वारस्य दाखवले आहे. आम्ही सामान्यत: व्यावसायिकांची भरती करतो आणि जर तो आमच्या संघाच्या गरजेनुसार खेळला तर त्याची निश्‍चित निवड केली जाईल. मात्र, हे आमच्या निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.

मुंबईचे मुख्य निवडकर्ता सलील अंकोला यांनी आशा व्यक्त केली की या निर्णयामुळे अर्जुनच्या कारकिर्दीला चालना मिळेल. आम्ही त्याला गेल्या वर्षी रणजी करंडक स्पर्धेसाठी निवडले होते. पण तो अंतिम अकरामध्ये स्थान मिळवू शकला नाही. तो एक अत्यंत हुशार मुलगा आहे आणि त्याला आपली क्षमता सिद्ध करता यावी, यासाठी त्याला फक्त काही सामन्यांसाठी वेळ देत आहोत, असे सांगितले.

देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम 8 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. परंतु अर्जुनला 11 ते 22 ऑक्टोबर (लीग टप्पा) दरम्यान होणार्‍या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत स्थान मिळण्याची शक्यता आहे. रणजी हंगाम 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. रणजी ट्रॉफीच्या एलिट गट डी मध्ये गोव्याच्या संघाला गेल्या मोसमात एक अनिर्णित आणि दोन पराभवांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा

Back to top button