गोव्यातील १८६ पंचायतींसाठी आज मतदानाला सुरुवात | पुढारी

गोव्यातील १८६ पंचायतींसाठी आज मतदानाला सुरुवात

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्यातील १८६ पंचायतींंसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील १८६ पंचायतींच्या १४६४ प्रभागासाठी ५०३८ उमेदवार रिंगणात आहेत. या पंचायत निवडणुकीत ९,९९,०२० मतदार मतदान करणार आहेत. परवा दिनांक १२ रोजी मतमोजणी होणार आहे. पंचायत निवडणुका जरी पक्षीय पातळीवर होत नसल्या तरीही सत्ताधारी पक्षाने आपलाच पक्ष पुन्हा निवडून यावा यासाठी प्रयत्न केले आहेत.

राज्यातील मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर तेवढीशी गर्दी नव्हती मात्र त्यानंतर दहा नंतर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी संध्याकाळी चार ते पाच या दरम्यान मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यांनी कोरोना नियंत्रण आयसोलेटेड कीट घालूनच मतदानाला यायचे आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा मतदान प्रक्रिया सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला आहे. राज्यातील १५३८ पैकी ४५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केल्यानंतर त्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन दिवस पाऊस जोरदार होता. मात्र आज सकाळी पाऊस नसल्यामुळे मतदार घरातून बाहेर पडून मतदान करताना दिसत आहेत.

 हेही वाचा

 

Back to top button