पणजी : सोळा हजार लिटर पाणी १ सप्टेंबरपासून मोफत : मुख्यमंत्री | पुढारी

पणजी : सोळा हजार लिटर पाणी १ सप्टेंबरपासून मोफत : मुख्यमंत्री

पणजी;  पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गोवा राज्यातील भाजप सरकारने १ सप्टेंबरपासून १६ हजार लिटर पाणी मोफत देणार असल्याची घोषणा आज (रविवार) केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.

जुन्या सचिवालयासमोर पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रारंभी ध्वजारोहण केले आणि त्यानंतर जनतेला उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमास मंत्रिगण, विरोधी पक्षातील आमदार, भाजपचे नेते, सरकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एखादी योजना किंवा घोषणा करण्याची दाट शक्यता होती.

त्यानुसार त्यांनी १ सप्टेंबर पासून गोमंतकियांना १६ हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी काल (शनिवारी) पासून राज्यातील मतदारसंघ संपर्क दौरा सुरु केला आहे. जनमानसाचा कौल त्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.

याशिवाय राज्यात आम आदमी पक्षाने पक्ष सत्तेवर आल्यास ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपला सत्तेवर आणायचे झाल्यास जनतेला काहीतरी गाजर दाखवावेच लागणार, यानुसार ही घोषणा झाली आहे, असे स्पष्ट दिसते.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांचा उल्लेख केला.

त्याशिवाय महापूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत, पारंपरिक व्यावसायिकांना दिलेला मदतीचा हात अशा सर्व विषयांना त्यांनी स्पर्श केला.

म्हादई विषयावर तडजोड नाही

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या म्हादई नदीच्या बाबतीत कोणतही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले.

त्या शिवाय खाण महामंडळ स्थापन केल्याने खाणी सुरु करण्यासाठी मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पहा व्हिडिओ : दै. पुढारीने पूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेत्यांना दिले जगण्याचे बळ

Back to top button