समताधिष्ठित समाजनिर्मितीचे आव्हान : देश म्हणून एकत्र येण्याची गरज

समताधिष्ठित समाजनिर्मितीचे आव्हान : देश म्हणून एकत्र येण्याची गरज
Published on
Updated on

सध्याच्या परिस्थितीत आपण सर्वांनी देश म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून एकात्मता जपणे हीच काळाची प्राथमिक गरज आहे. आपण एकत्र राहिलो तर ती 'ताकद' असेल आणि विभाजित राहिलो तर आपल्या नशिबी 'संघर्ष' असेल.

आपण सर्वजण आपल्यासारख्याच माणसांच्या समूहात राहतो. आजच्या संकटाच्या घडीला आपल्यातील एकी आणि एकमेकांप्रती असणारी सहानुभूती महत्त्वाची आहे. सहानुभूती आणि एकात्मतेची ही भावना आहे. यामुळेच तर आपण मानव आहोत. यातूनच समाज घडतो आणि माणूस कार्यरत राहतो.

सामूहिकपणे धैर्य आणि चैतन्य निर्माण करणे तसेच अन्याय आणि असमानतेची परिस्थिती संपवून परिवर्तन घडवून आणण्याचे आव्हान आजच्या तरुण पिढीपुढे आहे. पदवीधरांना मी नेहमीच परिवर्तनाचे प्रणेते बनण्याचे आवाहन करतो. हे परिवर्तन न्याय्य, समतामूलक आणि मानवी समाजाला सक्षम करणारे असावे. शिक्षण किंबहुना शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि तरुण पदवीधरांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून घेतला पाहिजे.

गंभीरपणे विचार करण्याची क्षमता, प्रश्‍न विचारण्याची इच्छा आणि मनाचे खुलेपण ही जीवनातील कोणतीही परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्याचे मध्यवर्ती त्रिसूत्री आहे. गांभीर्याने विचार करण्याच्या शक्‍तीमुळेच कोणत्याही व्यक्‍तीला वस्तुस्थिती जशी आहे तशी समजून घेता येते; एखाद्याच्या सांगण्यावर अवलंबून राहावे लागत नाही आणि वास्तव समजून घेणे हाच लहानमोठ्या संकटांना सामोरे जाण्यासाठीचा आधार आहे.

कठोर परिश्रम, समर्पणवृत्ती आणि द‍ृढतेला पर्याय नाही आणि यामुळेच आपण आपल्या जीवनात सर्वाधिक बदल करू शकतो. सध्याच्या संकटकाळात गेले अनेक महिने चोवीस तास आणि आठवड्यातून सात दिवस कठोर मेहनत घेतलेले हजारो लोक आहेत. सत्य आणि सचोटी हाच प्रत्येक गोष्टीचा पाया आहे, हा माझा जीवनानुभव आहे.

सचोटी नसेल तर सर्व काही विस्कळीत होऊन जाते. सत्य आणि सचोटी असेल तर सर्व गोष्टी अखेर मनासारख्याच होतील. देश जेव्हा या संकटातून बाहेर येईल, तेव्हा आपल्याला आपला समाज आणि अर्थव्यवस्थेची पुनर्रचना अशा प्रकारे करायची आहे, की जेथे विषमता आणि अन्यायाला थारा असणार नाही. सर्वप्रथम आपण सर्वांनी सर्वच आघाड्यांवर अतिशय वेगाने हालचाली सुरू केल्या पाहिजेत आणि आपल्या सर्व कृती उपयुक्‍त विज्ञानावर आधारित असल्या पाहिजेत.

वैज्ञानिक वास्तवावर आधारित नसलेल्या गोष्टी आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या मार्गात हानिकारक ठरतात. उपयुक्‍त विज्ञानाची मूळ संकल्पना सत्य स्वीकारणे आणि त्याला सामोरे जाणे ही आहे. म्हणूनच सध्याच्या संकटाचा, त्याच्या प्रसाराचा आणि व्याप्तीचा आपण सर्वप्रथम स्वीकार केला पाहिजे. विज्ञान आणि सत्य हा असा पाया आहे, ज्या बळावर आपण याही संकटाचा सामना करू शकतो आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही, अशी तजवीज करू शकतो.

सध्याच्या परिस्थितीत आपण सर्वांनी एक देश म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. आपल्यातील सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून एकात्मता हीच सध्याच्या काळाची प्राथमिक गरज आहे हे आपण ओळखले पाहिजे. आपण एकत्र राहिलो तर ती 'ताकद' असेल आणि विभाजित राहिलो तर नशिबी 'संघर्ष' असेल. आपल्या देशाच्या लोकसंख्येत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. सर्वांत असुरक्षित असलेल्या लोकांच्या दुर्दशेवर आपण अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशा घटकांना जेवढे आवश्यक तेवढे प्राधान्य दिले जात आहे, हे आपल्या प्रत्येक कृतीतून दिसले पाहिजे.

सध्याची स्थिती हृदयद्रावक आहे. जर आपण खेड्यांकडे आणि गरीब वर्गाकडे पाहिले तर आपल्याला केवळ साथरोगाचे सावटच नव्हे तर त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे भीषण आर्थिक परिणामही दिसून येतील. आपल्या देशाला सध्याच्या तुलनेत अधिक समताधिष्ठित समाज निर्माण करण्याची गरज असून, देश या संकटातून बाहेर पडत असताना समाजाची आणि अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे; जेणेकरून या प्रकारची विषमता आणि अन्याय यापुढे असूच नये. आपण सर्वांनी एकत्र यायला हवे आणि जेवढे शक्य आहे, तेवढे सर्वकाही करायला हवे. कारण, हीच काळाची मागणी आहे.

संकटाच्या या घडीला आणि त्यातून बाहेर पडल्यानंतरसुद्धा आपण स्वतःला कमकुवत समजता कामा नये. आपल्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही आहे. आजवरच्या जीवनप्रवासातून मी शिकलेली पहिली गोष्ट म्हणजे आपण नेहमी आपल्या सामर्थ्यापासून विचारांना सुरुवात केली पाहिजे. आपल्याकडे काय नाही, हे जाणणे आवश्यक आहेच. परंतु: आपल्याकडे जे आहे, त्याची आपण सर्वप्रथम कदर केली पाहिजे. हे कशासाठी करायचे? आपली बलस्थाने माहीत असतील तरच आपल्या कमकुवतपणावर मात करण्याची ऊर्जा आपल्याला मिळते. आपल्याकडे दुर्दैवाने शालेय शिक्षणापासून 'कुठे चुकते' यावर लक्ष केंद्रित केले जाते. याबाबत एका सशाची काल्पनिक कथा सांगता येईल. सशांच्या शाळेत एक नवा ससा दाखल झाला.

इतर सशांप्रमाणेच तो चांगल्या उड्या मारू शकत होता; पण पोहू शकत नव्हता. वर्षाअखेरीस त्या सशाने उड्या मारण्यात पहिला नंबर मिळवला आणि पोहण्यात नापास झाला. त्याचे पालक चिंतेत पडले. म्हणाले, "उड्या मारणं विसरून जा. ते तर तुला चांगलं येतंय. पोहण्यावर लक्ष केंद्रित कर." पालकांनी सशाला पोहण्याचा क्लास लावला. मग काय झालं असेल, कल्पना करा! ससा उड्या मारणं विसरून गेला. राहता राहिलं पोहणं… तुम्ही एखाद्या सशाला कधी पोहताना पाहिलंय?

मी शिकलेला दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे, सापडलेल्या पाच रुपयांपेक्षा कमावलेला एक रुपया कितीतरी मोलाचा असतो. माझा एक मित्र त्याच्या भाचीचे उदाहरण मला नेहमी सांगत असे. ती नाश्ता करताना नेहमी कुरकूर करायची. स्वयंपाक्याने खूप प्रयत्न केले; पण ती समाधानी झाली नाही. अखेरीस माझा मित्र त्याच्या भाचीला सुपर मार्केटमध्ये घेऊन गेला आणि शिजविण्यासाठी तयार अन्नपदार्थाचे पाकीट घेऊन आला. भाचीला ते पाकीट कापून डिशमध्ये घ्यावे लागले आणि त्यात पाणी घालावे लागले. त्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ तयार होण्यास दोन मिनिटे लागली. भाचीला त्या दिवशीचा नाश्ता चवदार वाटला.

फरक एवढाच होता की, तो तिने स्वतःच्या हाताने तयार केलेला होता. एखाद्या चांगल्या गोष्टीचे, कष्टाचे पारितोषिक मिळते, तेव्हाच्या आनंदाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही, हे मला उमगले आहे. वारशाने किंवा भेट म्हणून जे मिळते ते 'कम ईझी-गो ईझी' न्यायाने लवकर संपून जाते. एखादी गोष्ट कमावण्यासाठी आपण धडपड केली असेल, तरच तिची किंमत आपल्याला समजू शकते, असे माझे मत आहे.

मी शिकलेला तिसरा महत्त्वाचा धडा म्हणजे, कोणताही फलंदाज दरवेळी शतक करू शकत नाही. आयुष्यात अनेक आव्हाने असतात. तुम्हाला काही गोष्टी मिळतात, तर काही गमवाव्या लागतात. आपण जिंकण्याचा आनंद घेतला पाहिजे; पण त्याची हवा डोक्यात जाता कामा नये. ज्या क्षणी हे घडेल त्या क्षणी अपयशाच्या दिशेने प्रवास सुरू होईल. जर तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागला, तर तेही नैसर्गिक आहे असे समजा. त्यासाठी स्वतःला किंवा इतरांना दूषणे देऊ नका.

अपयश स्वीकारा, समस्येत स्वतःचा वाटा किती आहे, हे तपासा आणि त्यातून शिकून पुढे वाटचाल सुरू ठेवा. अन्य काहीही गमावले तरी चालेल; पण अपयशातून मिळालेला धडा कधीही गमावू नका. याखेरीज नम्रतेचे महत्त्व, उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्नशील राहणे, प्रतिकूल परिस्थितीत हार न मानणे, बदलांसाठी तयार असणे; पण मूल्यांशी कधीच तडजोड न करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुणी कितीही दोष काढले तरी स्वतःच्या संकल्पनेवर ठाम राहणे, असे अनेक धडे मला आयुष्यात शिकायला मिळाले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपण एका जागतिक संकटाचा मुकाबला करीत आहोत. अशा अवघड आणि आव्हानात्मक प्रसंगी युवकांनी जिद्दीने उभे राहिले पाहिजे आणि अनुभवातून शिकून, स्वतःला दोष न देता पुढेच चालत राहिले पाहिजे. तरच या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपला देश आर्थिकदृष्ट्या पुन्हा विजयी घोडदौड करू लागेल आणि कमीत कमी विषमता असलेला समाज आपण निर्माण करू शकू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news