

Jagatik Marathi Sammelan 2026
पणजी : गोव्याने मराठी भाषा व मराठी संस्कृतीचा नेहमीच आदर केला आहे. मराठीच्या वैचारिक परंपरेचा संवाद म्हणजे जागतिक मराठी संमेलन असून, जागतिक मराठी अकादमीचे हे संमेलन गोव्यातील मराठीची मुळे अधिक बळकट करण्यास मदत करेल. तसेच युवकांना उद्योजकतेचा संदेश देईल. युवकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या २१ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.९) कला अकादमी, पणजी येथे झाले. उद्घाटनानंतर स्वागताध्यक्ष या नात्याने डॉ. सावंत बोलत होते.
यावेळी संमेलनाध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष उदयदादा लाड, सरचिटणीस जयराज साळगावकर, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर, रमेश वंसकर, सागर जावडेकर, परेश प्रभू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, मराठी भाषा व मराठी मन यांचा जागतिक दृष्टिकोन आहे. गोव्यात मराठी व कोकणी या दोन्ही भाषांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आत्मसन्मानाचे साधन आहे. मातृभाषेला प्रत्येकाच्या मनात अनन्यसाधारण स्थान असते. मराठी शिकलेले अनेक जण जगभर नावलौकिक मिळवत आहेत, हे मराठी भाषेचे सामर्थ्य आहे. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे सशक्त पिढीची पायाभरणी होय, असेही त्यांनी नमूद केले.
संमेलनाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनिल सामंत यांनी केले. ‘शोध मराठी मनाचा’ हे संमेलन युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगत मराठी भाषेने मराठी माणसाला श्वास, विश्वास आणि जीवन अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा दिली, असे ते म्हणाले.
आजारपणामुळे गोव्यात उपस्थित राहू न शकलेले जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष कवी रामदास फुटाणे, महापालिका निवडणुकांमुळे अनुपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार तसेच अमेरिकेतील मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी आभासी पद्धतीने मनोगत व्यक्त केले.
या संमेलनात चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, अर्थव्यवस्था व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देश-विदेशातील मराठी मान्यवरांचा सहभाग आहे. उद्या शनिवार दि. १० व रविवार दि. ११ रोजी दिवसभर विविध उपक्रम, परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी उद्घाटनापूर्वी ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या विषयावर प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक महेश मांजरेकर यांची मुलाखत झाली. त्यानंतर ‘लक्ष्मीची पाऊले’ या सत्रात अनिल खंवटे, भरत गीते व लैभर खांगे यांनी आपले विचार मांडले. नाथ संस्थान औसा यांच्या वतीने ‘चंद्रभागेच्या तीरावर’ हा चक्री भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संजीवन अकादमी, पणजी यांच्या वतीने उद्घाटनपूर्व नांदी सादर करण्यात आली. उद्घाटनानंतर ‘मर्मबंधातली ठेव’ हा सवेश नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाचे निर्माते नितीन कोरगावकर होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संमेलनाचे उद्घाटक होते; मात्र महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांमुळे ते व अन्य दोन मंत्री गोव्यात येऊ शकले नाहीत. संमेलनाचा समारोप रविवार दि. ११ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जागतिक मराठी अकादमीचा कला जीवनगौरव पुरस्कार तर गोव्याचे उद्योगपती अनिल खंवटे यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार देऊन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रकाश प्रभूदेसाई, किरण ठाकूर, डॉ. गिरीश बोरकर, राजेंद्र देसाई, डॉ. चंद्रकांत गावकर, अशोक परब व कमलाकाक्ष नाईक यांचाही सन्मान करण्यात आला.
मराठी भाषेने आपल्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा दिला असून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. भाषा माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देते. उद्योगात उद्योजकतेसोबत संशोधनालाही महत्त्व असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
२१ व्या जागतिक मराठी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. स्पर्धेच्या अतिरेकात माणूस स्वतःतील माणूस विसरत चालला आहे की काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. आपल्या मुळांशी नाते आपल्याला एकटं पडू देत नाही आणि उंच भरारी घेण्यासाठी आत्मविश्वास देते. तंत्रज्ञानाच्या धावपळीच्या युगात माणूस रोबो न होता संवेदनशील व संस्कृत राहिला पाहिजे. जागतिक मराठी अकादमीचा हाच उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.