

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या 50 वर्षांत झाला नाही, तितका गोव्याचा विकास केवळ आठ वर्षांत झाला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून गोवा आणखी वेगळा दिसेल. तो स्वयंपूर्ण असेल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी व्यक्त केला. नवभारत निर्माणासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे आहे. यामुळे विकासासाठी 'कमळ' फुलवा, असे आवाहनही त्यांनी केेले.
गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा 'मैत्र सत्कार' करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रेसिडन्सी क्लब येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार विनय कोरे होते. दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मयूरचे संस्थापक डॉ. संजय पाटील उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 15 ऑगस्टला उद्घाटन
येत्या 15 ऑगस्ट रोजी गोव्याच्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्याची कनेक्टिव्हिटी पूर्ण होत आहे. गोवा राज्याचे बजेट 21 हजार कोटी रुपयांचे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या पर्यटन विकासासाठी आजअखेर 22 हजार कोटी रुपयांचा थेट निधी दिला. याशिवाय 300 कोटी रुपये अतिरिक्त दिले. तसेच विविध योजनांद्वारे दिलेला निधी वेगळाच असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे 'डबल इंजिन' असणारे सरकार असले तर विकास होऊ शकतो, हेच गोव्याच्या जनतेला पटवून दिले. त्यांना स्वयंपूर्ण गोवा पटवून देऊ शकलो. यामुळे 14-15 जागा येतील, टेकूचे सरकार स्थापन करावे लागेल, असे सगळे सांगत असतानाही त्यांचे म्हणणे खोटे ठरवत गोव्यात भाजपचे सरकार स्थानापन्न झाल्याचे सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी घडवलेला बदल लोकापर्यंत पोहोचवा. गेल्या 60-70 वर्षांत जे प्रश्न सुटले नाहीत ते मोदी यांनी गेल्या काही वर्षांत सोडवले. अयोध्येचा प्रश्न सुटला. काश्मीरचे 370 कलम हटवण्यात आले. मोदींनी भारत अखंड असल्याचे सिद्ध केले. भारतच विश्वगुरू बनू शकतो हे दाखवून दिल्याचेही डॉ. सावंत म्हणाले.
संकट काळात डॉ. सावंत खंबीरपणे उभे राहिले ः डॉ. जाधव
दै. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव म्हणाले, डॉ. सावंत यांनी जे शक्य नव्हते ते करून दाखवले आहे. कोरोना कालावधीत त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. त्यानंतरही नैसर्गिक संकटे येत गेली. मात्र, ते खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले. त्यांचा आत्मविश्वास अतुट होता. या निवडणुकीत गोव्याच्या जनतेने जे त्यांना दिले, ते त्यांनी केलेल्या कामांची पोचपावतीच आहे.
घरचा माणूस मुख्यमंत्री ः पाटील
आपल्या घरातील माणूस मुख्यमंत्री झाल्याच्या भावना डॉ. सावंत यांच्या कोल्हापुरातील मित्रपरिवारांत असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले की, कर्तृत्व आणि नम—ता यांचा सुरेख मिलाफ म्हणजे डॉ. सावंत आहेत.
आमदार विनय कोरे यांनी डॉ. सावंत म्हणजे ऊर्जा देणारी नवी विचारधारा आहे. गोव्यात त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत काम केले. जनतेने त्यांना कौल दिला. त्यांच्या कामाचे श्रेय त्यानाच दिले पाहिजे, म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदावर विराजमान केल्याचे सांगितले.
डॉ. नेहा जाधव यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. शरद टोपकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणजित सावंत यांनी आभार मानले. यावेळी डॉ.शिरीष पाटील, डॉ. राजेश कुंभोजकर, डॉ. अभिजित राऊत, डॉ. शिवराज देसाई, डॉ. गजेंद्र तोडकर, डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत पाटील, डॉ. हरिष नांगरे,डॉ. प्रशांत खुटाळे आदींसह शिक्षक उपस्थित होते. यावेळी विविध संस्थांच्यावतीने डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सुमारे तासभर डॉ. सावंत मित्राच्या गराड्यात आणि गप्पात रंगून गेले होते.
गोवा मुक्ती संग्रामाला दै. 'पुढारी'चा जनाधार
गोवा मुक्ती संग्रामाची पहिली नोंदणी दै. 'पुढारी'च्या कार्यालयातच झाली. 'पुढारी' कार्यालयातूनच पहिली तुकडी रवाना झाली. 'पुढारी'चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांनी गोवा मुक्ती संग्रामाला जनाधार मिळवून दिला. यामुळे दै. 'पुढारी' आणि गोव्याचे अतुट नाते असल्याचे त्यांनी सांगितले.