गोव्यात पुन्हा सावंत सरकार; ९ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रथमच झाला भव्यदिव्य सोहळा

गोव्यात पुन्हा सावंत सरकार; ९ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रथमच झाला भव्यदिव्य सोहळा
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये उभारलेल्या गोवा विधानसभेच्या इमारतीच्या भव्य व देखण्या प्रतिकृतीच्या समोर गोवा मंत्रिमंडळातील ९ मंत्री शपथबद्ध झाले. मंत्रिमंडळातील तीन जागा सध्या रिक्त आहेत. सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मात्र या सोहळ्यास उपस्थित नव्हते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि आतानसिओ मोन्सेरात यांनी मंत्रीपद व गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सर्वांना शपथ दिली. नऊ पैकी तीन जणांनी गोव्याची राजभाषा असलेल्या कोकणीतून शपथ घेतली. यात मुख्यमंत्री डॉ. सावंत, खंवटे व गावडे यांचा समावेश होता. राणे, गुदिन्हो, काब्राल व मोन्सेरात यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. नाईक आणि शिरोडकर यांनी हिंदीतून शपथ घेतली. शपथबद्ध झालेल्यांपैकी राणे, गुदिन्हो, काब्राल, गावडे हे सावंत यांच्या मागील सरकारमध्ये मंत्री होते. खंवटे हेही अल्पकाळासाठी महसूल मंत्री होते.

मंत्रिमंडळात एकही महिला नाही

भाजपच्या उमेदवारीवर डॉ. दिव्या राणे व जेनिफर मोन्सेरात या दोन महिला आमदार झाल्या आहेत. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये दोघींपैकी कुणालाही स्थान मिळाले नाही. तीन रिक्त जागांमध्ये आधीच सहा नावे आहेत. त्यामुळे यावेळी राज्यात एकही महिला मंत्री असणार नाही असे चित्र आहे. मागील मंत्रिमंडळात जेनिफर मोन्सेरात या महसूल मंत्री होत्या.

नागरिकांच्या उपस्थितीत प्रथमच झाला भव्यदिव्य सोहळा

गोवा मुक्तीनंतर ६० वर्षाच्या कालखंडात प्रथमच भव्यदिव्य अशा स्वरूपात शपथविधी सोहळा संपन्न झाला. तसेच पंतप्रधान व विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती हेही सोहळ्याचे आकर्षण होते. सात हजार क्षमतेच्या मुखर्जी स्टेडियममध्ये पाय ठेवण्यास देखील जागा नव्हती. त्याशिवाय स्टेडियमच्या बाहेरही बऱ्यापैकी गर्दी होती.

नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था

राज्यातील नागरिकांना शपथविधीसाठी खुले आमंत्रण देण्यात आले होते. तसेच सर्वांसाठी विशेष गोमंतकीय पद्धतीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शपथविधीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना भेटही दिली.

मंत्रिमंडळातील ३ जागांवर कोणाला संधी मिळणार?

मंत्रिमंडळातील तीन रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये, सांग्याचे आमदार सुभाष फळदेसाई, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर या पैकी कोणाला मंत्रिपदी संधी मिळेल याचे उत्तर या महिन्याच्या अखेरीस मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news