गोवा : ६७ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नायजेरियन तरुणाला अटक | पुढारी

गोवा : ६७ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नायजेरियन तरुणाला अटक

पणाजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा पोलिसांनी नायजेरिया येथील ओनय लकी या अमली पदार्थ विकणार्‍या 47 वर्षीय संशयिताला अटक केली. मंगळवारी, 22 रोजी रात्री मोलेभाट साळगाव येथील गोवा वाघ बार व रेस्टॉरंटमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. पोलिस पथकाने लकी याच्याकडून 66 लाख 95 हजार 500 रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले.

संशयित लकी हा किनारी भागासोबतच गावातील काही ठिकाणी अमली पदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. मंगळवारी साळगाव येथील बार अँड रेस्टॉरंटमध्ये लकी अमली पदार्थाचा व्यवहार करण्यासाठी आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये ओनय लकी याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 65 ग्रॅम एलएसडी हा पातळ अमली पदार्थ तसेच 20.45 ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ आढळला. या दोन्ही अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 66,95,500 हजार इतकी आहे. पोलिसांनी ओनय लकी याला मुद्देमालासह अटक केली असून पुढील तपास सुरू आहे .

दरम्यान, किनारी भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहार होत असल्याचे यापूर्वी विविध प्रकरणांतून स्पष्ट झालेले आहे. आता शहरी भागातील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्येही अमली पदार्थाचा व्यवहार सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button