Goa Election 2022 : शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला : आदित्य ठाकरे यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला | पुढारी

Goa Election 2022 : शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला : आदित्य ठाकरे यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

पणजी, पुढारी वृत्तसेवा:  शिवसेनेने युती धर्म पाळला; पण गेल्या पाच वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आमच्याच नाही जे काही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे मित्र पक्ष होते ते सर्व सोडून गेले. त्यामुळे ज्या ठिकाणी शिवसेनेचे अस्तित्व होते तिथे आम्ही लढायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये व मणिपूरमध्ये लढत आहोत,असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले.गोव्यात निवडणूकीच्या प्रचारासाठी आले असता ते बाेलत हाेते.  शिवसेनेचे राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही त्‍यांनी केली.

या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही गोव्यात ११ जागा लढवत आहोत. घरोघरी शिवसेना पोहोचली आहे. शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढत असताना प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार आहे. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायतीची निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स मॉडल सर्वच राज्यात नेणार आहोत. शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. शिवसेना गोव्याला नवीन नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

शिवसेनेने मैत्री धर्म पाळला

आदित्य म्हणाले, मागच्या काळात भाजपसोबत शिवसेनेची युती होती. बाळसाहेबांची भावना होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे असे ते सांगायचे. हिंदू मते फुटतील म्हणून आम्ही इतर राज्यात लढत नव्हतो. आमच्यातील काही शिवसैनिक त्यांच्या पक्षात गेले. खासदार आणि मंत्री झाले. तरीही आम्ही मैत्री जपायची म्हणून कुठेही लढलो नाही.

गोव्यात गावागावात शाखा

गोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार असल्याचे त्यांनी सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही. गेली १० वर्ष भाजपची राज्यात सत्ता आणि केंद्रात सात वर्ष सत्ता. तरीही शाश्वत विकास नाही. दुर्गम भागात पाणी प्रश्न असता तर समजू शकलो असतो, पण मुख्य गोव्यात पाण्याचा प्रश्न आहे. मग कुणाचा विकास झाला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :  

Back to top button