सातारा : गट रचनेवरच ठरणार इच्छुकांची व्यूहरचना; राजकीय हालचालींना वेग | पुढारी

सातारा : गट रचनेवरच ठरणार इच्छुकांची व्यूहरचना; राजकीय हालचालींना वेग

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत मार्चमध्ये संपणार आहे. त्यामुळे अगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग येणार आहे. नव्याने गट व गणांची रचना झाल्यानंतर गट रचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. सध्या प्रशासनाने गट व गणांचे प्रारुप प्रभाग रचनेचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहेत. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करणार असल्याने त्यानंतरच प्रभाग रचना निश्चित होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत जिल्हा परिषद गटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गट व गणांची संख्या जिल्ह्यात वाढणार आहे. मात्र कोणत्या तालुक्यात किती गट व गणांची संख्या वाढणार आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नव्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या रचनेत कुठल्या भागाचा समावेश होणार आहे किंवा कुठल्या गटात कुठले गाव जाणार आहे ? विद्यमान सदस्यांची गाव नव्या गट रचनेत राहणार की नाही ? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

त्यातच तालुक्यांमध्ये गट रचनेत होणार्‍या बदलात आपले गाव दुसर्‍या गटात जाते की काय अशी धास्ती विद्यमान सदस्यांना लागली आहे. विद्यमान सदस्यांनी आपल्या गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे नव्याने होणार्‍या जिल्हा परिषद गट रचनेच्या व्यूहरचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांचा कच्चा आराखडा तयार करून तो तयार झाला आहे. तहसिलदार व प्रांतांनी तो अहवाल जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. दि. 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी गट व गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. निवडणूक आयोगाने या अहवालावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच गट व गणांची प्रारुप प्रभाग रचना निश्चित होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची पाच वर्षांची मुदत 20 मार्च 2022 रोजी तर 11 पंचायत समित्यांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 ला संपत आहे. त्याआधी किमान 15 दिवस आधी नियोजनानुसार ही निवड पक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. 12 जानेवारी 2022 पर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे अपेक्षित होते. परंतू अद्याप गट, गणरचना व आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यातच ओबीसी आरक्षणासंदर्भात संभ्रमावस्था असल्याने निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे 41, काँग्रेसचे 7, भाजपाचे 6, शिवसेनेचे 2, पाटण विकास आघाडी1, सातारा विकास आघाडी 3, अपक्ष 1, कराड तालुका विकास आघाडी 3, असे पक्षीय बलाबल आहे. राज्यस्तरावर महाविकास आघाडीची सत्ता असली तरी सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, मनसे व अन्य पक्षांनी अगामी निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

तालुकानिहाय सर्व पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाचपणीस सुरूवात केली असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. गट व गणाची रचना व आरक्षण सोडतीनंतरच जिल्ह्यात राजकीय धुरळा पहावयास मिळणार आहे.

प्रभाग रचनेवर लवकरच होणार शिक्कामोर्तब…

जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे प्रारूप प्रभाग रचनेचे अहवाल प्रांताधिकारी व तहसिलदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले आहेत.जिल्ह्याच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्याची तपासणी दि. 10 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जाणार आहे. या तपासणीनंतरच गट व गणांवर अंतीम शिक्कामोर्तब होणार आहे.

हेही वाचा

Back to top button