ग्लेन टिकलो : चार वर्षे कारागृहात कोणाचे होते वास्तव्य?

ग्लेन टिकलो : चार वर्षे कारागृहात कोणाचे होते वास्तव्य?

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
हळदोणा मतदारसंघात मी गुंडागर्दी करतो, असे आरोप टीएमसीचे नेते किरण कांदोळकर माझ्यावर करतात. मुळात ग्लेन टिकलो हा कधी कुणावर रागवताना किंवा व्यक्तिला कानशिलात मारताना कुणीतरी पाहिले आहे का? चार वर्षे कुठली व्यक्ती ही कारागृहात होती, हे सर्वश्रुत आहे, असे म्हणत आमदार ग्लेन टिकलो यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन करीत किरण कांदोळकरांचा समाचार घेतला.

हळदोणा मतदारसंघात ग्लेन टिकलो हे भाजपाचे उमेदवार आहेत. हळदोणात गुंडागर्दी वाढली असून, त्याला टिकलो हे यास कारणीभूत असल्याचा आरोप कांदोळकरांनी केला होता. टिकलो म्हणाले, मध्यंतरी जेव्हा दिल्लीला भाजपाचे सदस्य गेले होते, त्यावेळेस भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या डोक्यात बाटली फोडून त्यांना रक्तबंबाळ कुणी केले. किरण कांदोळकर हे हॉटेलमध्ये माझे रुममेट होते, तेव्हा त्यांनी मलाही शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. तेव्हा ते मद्यधुंदीत होते. तसेच मटका व्यवसायातून कुणी पैसे केले आहेत? अशा शब्दांत हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी टीएमसीचे गोवा प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकरांवर जहरी टीका केली.

हळदोणा हा शांतप्रिय गाव म्हणून ओखळला जातो. गावची अस्मिता आम्ही राखली आहे. सिद्धी नाईक हिच्या मृत्यूप्रकरणात कांदोळकर हे मला व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत होते. त्यांनी तथ्यहिन व खोटे आरोप करीत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुळात सिद्धीने आत्महत्या केली असे मी वक्तव्य केले नव्हते. मी काही पोस्टमार्टम अहवाल देत नाही, किंवा मी फॉरेन्सिकचा डॉक्टरही नाही. जे काही अहवालातून समोर आले, ते सार्वजनिक आहे. मी काहीही विधान केले नव्हते, असे सांगून टिकलो यांनी आरोपांचे खंडन केले.

हळदोणावासीयांना यातील सत्य माहित आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकानंतर, तेथील लोकांवर जे अत्याचार व हिंसा झाली होती, ते सर्वांनीच पाहिले आहे. अशा गुंडागर्दीची गोव्याला गरज आहे का? जर मला दादागिरीच करायची असती तर सुरुवातीपासून मी तसा वागलो असतो. माझ्या घराच्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. हळदोणा हा माझा परिवार असल्याचे ग्लेन टिकलो म्हणाले. हळदोणेवासीयांचा माझ्यावर विश्वास असल्यानेच, त्यांनी मला दोनवेळा आमदार म्हणून निवडून आणले. येत्या निवडणुकीतही जनता आपल्या पाठीशी राहिल, असा विश्वास टिकलो यांनी व्यक्त केला.

पाहा व्हिडिओ : कोण आहे सिद्धार्थ जाधवची क्रश ? | Rapid fire with Sidharth Jadhav 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news