म्हापसा : बार्देश तालुक्यात महिला उमेदवार घडविणार इतिहास? | पुढारी

म्हापसा : बार्देश तालुक्यात महिला उमेदवार घडविणार इतिहास?

म्हापसा : योगेश मिराशी
बार्देश तालुक्यातून गोवा विधानसभेवर महिला आमदार निवडून येऊन 28 वर्षे उलटली आहेत. मतदारसंख्येवर वरचढ असूनही महिला उमेदवारांना निवडून आणण्यात यश मिळालेले नाही आणि उमेदवारी अर्ज भरण्यातही त्या मागे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बार्देश तालुक्यातील रिंगणात असलेल्या उमेदवार या दुष्काळ संपवून इतिहास घडवू शकतील का? याकडे आता बार्देशकारांच्या नजरा आहेत.

सात मतदारसंघ असलेल्या बार्देश तालुक्याने गोव्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावली. कालांतराने माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस उर्फ बाबूश डिसोझा, माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा, माजी सभापती प्रा. सुरेंद्र सिरसाट, तोमाझिन कार्दोज आणि इतर अनेक दिग्गज नेते या भागांतून निवडून आले. मात्र, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत बार्देशमधून केवळ एकच महिला आमदार निवडून आली आहे.

1994 मध्ये हळदोणा मतदारंसघातून फक्त फातिमा डिसा या गोवा विधानसभेवर निवडून आल्या होत्या. या कालावधीत अनेक महिला उमेदवार मागील अनेक वर्षांपासून, विधानसभा लढवण्यासाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु, त्यांना अद्याप यश आलेले नाही.आगामी विधानसभा निवडणुकीत यावेळी सात महिला संपूर्ण बार्देशातून निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये पर्रा सरपंच तथा माजी मंत्र्यांची पत्नी डिलायला लोबो या काँग्रेसकडून शिवोलीतून रिंगणात आहेत. कोलवाळ जि. पं. सदस्या कविता कांदोळकर या थिवीतून उमेदवार आहेत. तसेच शिवोलीतून डायना फर्नांडिस (संभाजी ब्रिगेड पक्ष), पल्लवी दाभोलकर (अपक्ष), करिश्मा फर्नांडिस (शिवसेना) या उमेदवार आहेत. तर म्हापशातून सामाजिक कार्यकर्ता नीता खानविलकर (अपक्ष) म्हणून रिंगणात आहे. तर हळदोणामधून माजी सरंपच पूजा मयेकर (अपक्ष) म्हणून उमेदवार आहेत. तालुक्यात एकूण 1,01,380 महिला मतदार आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button