मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल यांच्या उमेदवारीचे भवितव्य उद्या ठरणार | पुढारी

मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल यांच्या उमेदवारीचे भवितव्य उद्या ठरणार

पणजी, विलास ओहाळ : गोव्याचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर राजधानी पणजीतून निवडणूक लढवू इच्छितात; पण त्यांच्या उमेदवारीचा निर्णय रविवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत होणार आहे. राज्य कार्यकारिणीने आमदार बाबूश मोन्सेरात यांचेच नाव पुढे पाठविले आहे. त्यामुळे दिल्लीतील होणाऱ्या बैठकीत उत्पल यांची उमेदवारीचे  भवितव्य ठरणार आहे.

भाजपने उमेदवारी न दिल्यास आपण काय करणार, असे अनेकवेळा उत्पल यांना विचारण्यात आले आहे. त्यावर त्यांनी अपक्ष का होईना; पण निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार केल्याचे दिसून आले आहे. ‘आता माघार नाही’ अशा शब्दात त्यांनी आपले मत ट्विटरवरून सांगितले होते.

उद्योजक असणारे उत्पल यांनी प्रचार सुरूही केला आहे. ते भाजपविरोधात एकही अक्षर उच्चारत नाहीत. काही नेत्यांविषयी त्यांच्या मनात आढी असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून जाणवते. काही निवडक कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीभेठी घेण्यावर सध्या त्यांचा भर आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी ते दिल्लीस्थित पक्षश्रेष्ठींनाही भेटून आलेले होते. पक्षसूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत उत्पल यांचा विषय पोहोचला गेला आहे.

प्रत्येक सदस्य पक्षाचा नेता असत नाही? : सिद्धार्थ कुंकळ्येकर 

राजधानी पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची शुक्रवारी पणजीत पत्रकार परिषद झाली. पणजी पोलिस ठाण्यावर हल्ल्याचा तसेच बलात्काराचा आरोप असणाऱे आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देणे योग्य आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला. यावर तो पक्षाचा निर्णय असे ते म्हणाले.

उमेदवारी जाहीर झालेली नाही, उत्पल यांनी प्रचार सुरू केला आहे यावर तुमचं मत काय असे विचारताच मला माहिती नाही, इतकेच त्‍यांनी सांगितले. उत्पल पक्षाचे नेते नव्हेत का? या प्रश्नावरही मला माहिती नाही, हेच उत्तर सिध्दार्थ यांनी दिले आहे. तसेच उत्पल राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत, असे विचारताच सिद्धार्थ यांनी प्रत्येक सदस्य नेता असत नाही असे उत्तर दिले.

बलात्काराचा आरोप आणि उमेदवारी

पक्षाच्या विरोधात न बोलणारे उत्पल यांनी संताप व्यक्त केल्यामुळे भाजपसह सर्वांच्याच भूवया उंचावल्या. गुन्हेगारांना, बलात्काराचे आरोप असणार्‍यांना पक्षाची उमेदवारी मिळते, याविषयी उत्पल यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यांचा रोख सध्याचे राजधानी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे आहे. पक्षनिष्ठेला काही किंमत नाही का? अशी त्यांनी जाहीर विचारणा केली. अशी भाषा त्यांनी प्रथमच वापरलेली आहे.उत्पल यांनी ही भूमिका चार वर्षांपूर्वीच घ्यायला हवी होती, त्याचा नक्की फायदा झाला असता, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर व्यक्त केली .

पर्रीकरांचा पूत्र हा निकष असू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना उत्पल यांच्या उमेदवारीविषयी प्रश्न विचारला होता. यावर पर्रीकरांचा पूत्र हा उमेदवारीचा निकष असू शकत नाही. चांगले काम असेल तर विचार होईलही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्‍हटलं हाेते.

हेही वाचलंत का?

Back to top button