

पुणे/येरवडा; पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी परिसरातील आठवीत शिकणार्या दोन अल्पवयीन मुली घरी न सांगता साऊथ कोरियाला जाण्यासाठी मुंबईत पोहचल्या. इकडे पालकांनी मुली घरी न आल्यामुळे विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गाठले. पोलिस अधिकार्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलविल्याने रात्री दोन वाजता पालकांना मुंबईत मुली सुखरूप आढळून आल्या. विश्रांतवाडी परिसरात राहणार्या अल्पवयीन मुली राधा आणि गौरी (नावे बदलली आहेत) या शाळकरी मुलींनी घर सोडून दक्षिण कोरिया गाठण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 2:30 आपली मुलगी राधा बराच वेळ घरात नाही हे वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी गुगलवर समाजसेवक समीर निकम यांना मदतीसाठी फोन केला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान, तिच्या बरोबरच्या शाळेतील गौरी सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सापरस पोलिस चौकीतील सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख यांनी तत्काळ सर्व यंत्रणांना माहिती दिली. एकीकडे पालक पोलिसांसमोर शोक व्यक्त करत होते. दरम्यान, मुंबईमधून एक फोन एका मुलीच्या आजीला आला. समीर निकम यांनी ही बाब शेख यांच्या लक्षात आणून दिली. शेख यांनी त्यावर फोन केला. समोरून टॅक्सी ड्रायव्हर बोलत होता.
शेख यांनी त्या ओला ड्रायव्हरला फोनवरूनच गाडी थांबवून तेथील ट्राफिक हवालदारास फोन देण्यासाठी दम भरला. हवालदारास शेख यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात मुलींना घेऊन जाण्यास सांगितले. इकडून पालकांना मुंबईच्या दिशेने मुलींना घेण्यासाठी पाठवले. हा सर्व घटनाक्रम रात्री 2 वाजेपर्यंत सुरू होता. विश्रांतवाडी पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे दोन मुली सुखरूप घरी पोहचल्याने पालकांनी पोलिसांचे आभार मानले.
सध्या मुला-मुलींमध्ये बीटीएस या दक्षिण कोरियन ग्रुपचे खूप आकर्षण आहे. हा ग्रुप गाणी आणि डान्स करण्यात अव्वल आहे. या मुलींनादेखील या ग्रुपचे खूप आकर्षण आहे. त्यांना कुठून तरी माहिती मिळाली की, मुंबईत या शोचे ऑडिशन होते अन् ऑडिशन झाले की, ते दक्षिण कोरियाला घेऊन जातात. त्यामुळे या मुली पुण्यावरून मुंबईत रविवारी पोहचल्या, अशी माहिती अन्सार शेख यांनी दिली.
हेही वाचा