

शाडू माती ही मर्यादित संसाधन आहे. त्यासाठी त्याचे उत्खनन न करता त्याचा पुनर्वापर करूया.. ही संकल्पना समोर ठेवून यंदा शाडू माती रक्षक असा उपक्रम अनंत चतुदर्शीच्या दिवशी शहरातील विविध सामाजिक संस्था राबविणार आहेत.
शाडू मातीची गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर, विरघळलेली माती मूर्तिकारांना देऊन पुढील वर्षी त्याच मातीची मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना देण्यात येणार आहे. शाडू मातीचा पुनर्वापर करायचा अशी साधी सोपी कल्पना या उपक्रमाची असून, पुण्यातील इकोएक्झिट या संस्थेची ही संकल्पना असून, ती यंदा शहरात राबविण्यात येणार आहे.
विसर्जनाच्या दिवशी गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करायचे आणि ती माती कलेक्शन सेंटरला द्यायची, तिथून पुढे ती मूर्तिकारांकडे जाईल असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. यामध्ये घरगुती विसर्जन किंवा कृत्रिम तलावात विसर्जन असे दोन पर्याय आहेत. घरगुती विसर्जन करताना ज्या पात्रामधे विसर्जन करणार त्यात एक स्वच्छ कापड ठेवायचे. मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर कपड्याची टोक बांधून त्याची पोटली तयार करायची व ती कलेक्शन सेंटरला द्यायची. शाडू माती रक्षक म्हणून गणपती विसर्जनानंतर शाडू मातीचा पुनर्वापर या प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन या सामाजिक संस्था करत आहे.
शाडू माती का गरजेची आहे?
शाडू माती पांढरट करडया रंगाची असते. माती पाण्याच्या संपर्कात येताच तिची आकार्यता वाढते म्हणून मातीस हवा तसा आकार देता येतो. ही माती कोकण, गुजरातमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. मात्र आता नष्ट झालेले नदीकाठचे गवत, मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या नद्यांमुळे शाडू मातीचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. वाहत्या नदीकाठी मिळणाऱ्या शाडूपासून मूर्ती निर्माण करण्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. शाडूचे वैशिष्टय़ म्हणजे ती पाण्यात सहज विरघळते, मात्र ही विरघळलेली शाडू पाण्याबरोबर सहज वाहत नदीच्या किनारी गाळाच्या रूपात स्थिरावते. गणपतीत वाहिलेल्या पत्रींमध्ये वनस्पतीजन्य पदार्थ मिसळले जातात, कुजण्याच्या प्रक्रियेतून त्यातील कर्ब वाढू लागतो आणि नदीकाठी गाळ वाढत जातो.
शाडू माती मर्यादित संसाधन
मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास
गाळ साचल्याने सागरी जीवनावर परिणाम
शाडू मातीचा पुनर्वापर शक्य
उपक्रमात सहभागी झालेल्या संस्था
निसर्गयान, ग्रंथ तुमच्या दारी, नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इस्पॅलियर स्कूल, डे केअर, पुणे विद्यार्थिगृह, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, वैराज कलादालन, धन्वंतरी कॉलेज यांसारख्या अनेक संस्था उपक्रमात सहभाग घेणार आहेत.
हेही वाचा :