

भाग्यश्री जगताप-मोरे
छत्रपती संभाजीनगर: गणेशोत्सवाला सामाजिक सलोख्याची अनोखी किनार लागली आहे. येथील बाल कन्हैया गणेश मंडळाच्या गणरायाला गेल्या सोळा वर्षांपासून दररोज सिटी चौक येथील फुलांचे व्यापारी शेख नसीर हे स्वतः पुष्पहार अर्पण करीत आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरणारी ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. विशेष म्हणजे याचा कोणताही मोबदला ते घेत नाहीत.
धावणी मोहल्ला येथील बाल कन्हैया गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष धीरज सिद्ध व फुलांचे व्यापारी नसीर शेख यांचीअनेक दिवसांपासून मैत्री आहे. शहरात अनेकदा हिंदू-मुस्लिम वाद टोकाला गेले, परंतु अशा वातावरणातही या दोघांचे सख्य कधीच कमी झाले नाही.
हिंदूच्या प्रत्येक सणांसाठी हिरीरीने भाग घेणारे नसीर शेख गेल्या दहा वर्षांपासून या बाल कन्हैया गणेश मंडळाच्या गणरायाला स्वतःहून पुष्पहार बनवून देत आहेत. सकाळी एक हार आणि सायंकाळी एक हार असे दोन हार सलग दहा दिवस वेळेच्या आत पुरवण्याचे काम शेख नसीर आजही करीत आहेत. ही आगळी वेगळी मैत्री परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादाई ठरत आहे.
पुष्पवृष्टीसाठीही पुढाकार
शेख नसीर केवळ गणरायाला पुष्पहारच देत नाहीत तर गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत पुष्पवृष्टी करण्यासाठी लागणाऱ्या फुलांचा पुरवठा देखील करतात. यावेळी सुमारे एक क्विटलपेक्षाही जास्त फुलांची उधळण मिरवणुकीदरम्यान होणार असल्याची माहिती शेख नसीर यांनी दिली. तसेच या सेवेतून माझ्या मनाला शांती मिळते अशी भावनाही त्यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केली.