

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य मेक्सिकोमधील (central Mexico) अगुआस्कॅलिएंट्स येथे इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर आगीचा भडका उडाला असून या आगाने रेल्वे आणि घरांना वेढले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये मालवाहू रेल्वे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसत आहे.
मेक्सिकोच्या (Mexico) एल युनिव्हर्सल वेबसाइटने म्हटले आहे की आगीत अडकलेल्या १,५०० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. आगीत काही घरे आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. पण अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
महापौर लिओ मॉन्टानेझ यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की ज्या ठिकाणी इंधनवाहू ट्रकचा अपघात झाला तेथे आजूबाजूच्या भागात ३०० घरे आहेत. यातील १२० घरांचे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रकने रेल्वेला धडक दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे. सुमारे २०० फायर फायटर्स आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे एल युनिव्हर्सलने म्हटले आहे. एका व्हिडिओत आगीच्या ज्वाळांमधून रेल्वे जाताना दिसत आहे.
हे ही वाचा :