

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मित्र मानसिक आजारी असल्याचा फायदा घेत त्याच्याकडील दोन मोबाईलचा अपहार करून पेटीएमचा पासवर्ड माहिती करून घेतला आणि पेमेंट बँकेमधून 15 हजारांचे कर्ज काढून फसवणूक करणार्या मित्रावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिश कन्हय्यालाल परिमो (रा. वानवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. मानसिक आजारी असलेल्या मित्राच्या वडिलांनी अनिश विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 ऑक्टोबर 2020 ते 8 एप्रिल 2022 दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिश हा फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र असून, त्यांचा मुलगा हा मानसिक आजारी आहे. याचा फायदा घेऊन अनिशने त्याच्याकडील 55 हजारांचे दोन मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन त्याचा अपहार केला. त्याच्या नकळत अनिशने त्याचा पेटीएम पासवर्ड नंबर मिळवून परस्पर पेमेंट बँकेमधून 15 हजारांचे कर्ज प्राप्त कले. ते मिळालेले पैसे त्याने मुंबई आणि बेंगलोर येथे वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासंबंधीचा अर्ज त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिल्यानंतर चौकशीत हा प्रकार समोर आला. याबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.