Fifa WorldCup : जेतेपदाच्या दावेदारांत ब्राझील, अर्जेंटिना टॉपवर

Fifa WorldCup : जेतेपदाच्या दावेदारांत ब्राझील, अर्जेंटिना टॉपवर
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत जगातील तब्बल 32 संघ सहभागी असले तरी यामध्ये एकूण सहा संघ जेतेपदाचे दावेदार आहेत. यामध्ये बलाढ्य ब्राझील व अर्जेंटिना टॉपवर आहेत. स्पोर्टस् वेबसाईट ओप्टाने सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने फिफा वर्ल्डकपमध्ये सहभागी होत असलेल्या सर्व संघांच्या डाटाचे विश्लेषण केले. यामध्ये ब्राझीलसह एकूण सहा संघांना जेतेपदाचे दावेदार मानण्यात आले आहे. हे संघ खालीलप्रमाणे आहेत.

ब्राझील : फिफा वर्ल्डकपच्या इतिहासात ब्राझीलने आतापर्यंत विक्रमी पाचवेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी ब्राझीलने 2002 मध्ये शेवटचा विश्वचषक पटकावला होता. तर 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत हा देश उपांत्यपूर्व फेरीतच बाहेर पडला होता. या स्पर्धेत या संघाला बेल्जियमकडून 2-1 अशा गोलफरकाने पराभूत व्हावे लागले होते. यंदाची कोपा अमेरिका चषक स्पर्धा जिंकण्यास अपयश आले असले तरी ब्राझीलच फिफा वर्ल्डकपच्या जेतेपदाचा टॉप दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. कारण, यावेळी ब्राझीलचे आक्रमण अत्यंत धारधार आहे. यावेळी फॉर्ममध्ये असलेला प्रमुख खेळाडू नेमारकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. विनिशियस ज्युनिअर, गॅब्रिएल व रफिना हे संघाचे आक्रमण सांभाळतील. वेबसाईट ओप्टाच्या विश्लेषणानुसार ब्राझील संघ जेतेपद पटकावण्याची शक्यता 16.13 टक्के इतकी आहे.

अर्जेंटिना : यापूर्वी दिएगो माराडोनाने 1986 मध्ये झालेल्या स्पर्धेचे अर्जेंटिनाला विश्वविजेतेेपद मिळवून दिले होते. त्यानंतर हा देश 2014 मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र, जेतेपदाने हुलकावणी दिली होती. तर 2018 मध्ये हा देश राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर 2021 मध्ये जोरदार पुनरागमन करताना अर्जेंटिनाने कोपा अमेरिका चषक स्पर्धेचे जेेतेपद पटकावले. प्रमुख आणि अनुभवी लियोनल मेस्सी अर्जेंटिनाचे आक्रमण सांभाळेल. तसेच मिडफिल्डर एंजल डी. मारिया व डी. पॉल हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर डिफेंडर लिसांड्रो मार्टिनेजच्या समावेशाने अर्जेंटिनाची बचावफळी आणखी मजबूत झाली आहे. अर्जेंटिनाचा संघ कतारमधील स्पर्धा जिंकचण्याची शक्यता 13.1 टक्के इतकी आहे.

फ्रान्स : या युरोपियन देशाने दोनवेळा विश्वचषक जिंकला आहे. गजविजेता म्हणून फ्रान्सचा संघ कतारमधील स्पर्धेत उतरणार आहे. तत्पूर्वी फ्रान्सने 1998 मध्येही विश्वविजेतेपद पटकावले होते. सध्याची स्थिती पाहता फ्रान्सला अत्यंत समतोल संघ म्हणून पाहिले जाते. संघाचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बापेच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. मात्र, आणखी एक प्रमुख खेळाडू करीम बेंजेमा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे हा संघ काहीसा कमकुवत बनला आहे. यामुळे फ्रान्सची मदार प्रामुख्याने एम्बापेवरच अवलंबून असणार आहे. विश्लेषणानुसार फ्रान्सचा संघ विश्वचषक जिंकण्याची शक्यता 12 टक्के इतकी आहे.

स्पेन : 2010 चा फिफा वर्ल्डकप जिंकणार्‍या स्पेनच्या यंदाचे जेतेपद मिळविण्याची शक्यता 8.9 टक्के इतकी आहे. या देशाने आजपर्यंत एकदाच विश्वचषक जिंकलेला आहे. 2018 मध्ये स्पेनची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली होती. त्यावेळी हा संघ राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडला होता. यावेळी हा देश नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरत आहे. बार्सिलोनाचे माजी आणि स्पेनचे विद्यमान प्रशिक्षक लईस एनरिके हे तातडीने निर्णय घेण्यास प्रसिद्ध आहेत. 2015 च्या हंगामात त्यांनी बार्सिलोनाला तीन चषक जिंकून दिले होते. यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेन चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. याशिवाय स्पेनच्या संघाचे मैदानावरील पासिंग कौशल्य कमालीचे चांगले आहे. वरील संघाशिवाय इंग्लंड व जर्मनी हे देश यंदाचे जेतेपद मिळविण्याची शक्यता अनुक्रमे 8.8 व 7.7 टक्के आहे.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news