Kylian Mbappe : एमबाप्पेच्या ‘जादू की झप्पी’ने जिंकली चाहत्यांची मने! (Video)

Kylian Mbappe : एमबाप्पेच्या ‘जादू की झप्पी’ने जिंकली चाहत्यांची मने! (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रान्सच्या एमबाप्पेने मोरोक्कन खेळाडूंना (kylian mbappe) दिलेल्या 'जादू की झप्पी'ने अवघ्या फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली आहेत. सेमीफायनलचा अडथळा पार करून अंतिम फेरी गाठल्याचा आनंद बाजूला ठेवून एमबाप्पेने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरूनही या फ्रेंच फुटबॉलपटूने एक खास पोस्ट करून पराभवाने खचलेल्या मोरोक्कन खेळाडूंचे मनोबल वाढवले. एमबाप्पेने मोरोक्कोचा बचावपटू अचराफ हकीमीसह स्वतःचा फोटो ट्विट केला असून 'भावांनो, दु:खी होऊ नका, तुम्ही जे केले त्याचा सर्वांना अभिमान आहे. तुम्ही इतिहास घडवलाय!', अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

मोरोक्कोच्या जर्सीत एम्बाप्पेचा जल्लोष…

90 मिनिटांचा खेळ संपला होता. 6 मिनिटांचा स्टॉपेज टाईम देण्यात आला. मोरोक्कोचे खेळाडू शेवटच्या मिनिटापर्यंत फ्रान्सचे दोन गोल फेडण्यासाठी जीवाचे रान करत होते. पण त्यांना यश येत नव्हते. अखेर रेफरींनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि एका क्षणात मोरोक्कोचे खेळाडू जागच्या जागी सुन्न झाले. डोळे पाणावलेले. पराभवाचे शल्य त्यांना बोचत होते. दुसरीकडे फ्रान्सच्या गोटात विजयाचा जल्लोष सुरू झाला. फ्रेंच खेळाडू एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त करत होते. मात्र फ्रेंच स्टार एमबाप्पे (kylian mbappe) मोरोक्कोच्या हकिमीकडे गेला. त्याचे दोन्ही हात पडून त्याला जमीनीवरून उठवले आणि खांद्यावर हात टाकत, डोके गोंजारत तो सांत्वन करताना दिसला. या भावनिक दृश्याने मैदानात उपस्थित असणारा प्रत्येक चाहता गलबलून गेला. काही वेळाने दोघांनी एकमेकांच्या जर्सीचे अदानप्रदान केले. एमबाप्पेने हकिमीची 2 नंबरची जर्सी परिधान करून सलग दुस-यांदा अंतिम फेरी गाठल्याचा आनंद साजरा केला. हकिमीनेही एमबाप्पेची 10 नंबरची जर्सी घालून जड पावलांनी मैदान सोडले.

फुटबॉलचे मैदान हे जरी दोन प्रतिस्पर्धी संघासाठी युद्धभूमी असली तरी या खेळात अवघ्या जगाला एकत्र आणण्याची ताकद आहे. सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखीत केली. वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करत असलो तरी सामना संपल्यानंतर आपण फक्त एक चांगले खेळाडू असतो, हे फ्रान्सच्या एमबाप्पेने (kylian mbappe) दाखवून दिले आहे.

एमबाप्पे आणि हकिमी जिगरी दोस्त..

एमबाप्पे आणि हकिमी हे दोघेही पॅरिस सेंट जर्मन (PSG) क्लबकडून खेळतात. जुलै 2021 मध्ये हकिमी जेव्हा पीएसजीचा भाग झाला तेव्हा दोघांमध्ये एका सुंदर मैत्रीची सुरुवात झाली. एमबाप्पेने हकिमीला फ्रेंच भाषा शिकवण्यात मदत केली. दोघेही एकमेकांचे सणसभारंभ एकत्र साजरा करतात. हकिमीच्या शिफारशीनंतर एमबाप्पेने अरबी पाककृती चाखली आणि तिच्या प्रेमातच पडला. दोघेही समवयस्क आहेत. हकिमी हा एमबाप्पे पेक्षा केवळ 46 दिवसांनी मोठा आहे. फ्रान्सने 12 जुलै 1998 साली पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर 4 नोव्हेंबरला हकिमीचा तर 20 डिसेंबरला एमबाप्पेचा जन्म झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news