पुढारी ऑनलाईन डेस्क : लिओनेल मेस्सी आणि कायलियन एमबाप्पे यांनी चालू फिफा विश्वचषकात समान 5-5 गोल केले आहेत. सध्या दोघेही गोल्डन बूटसाठी प्रबळ दावेदार आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, अंतिम फेरीनंतरही मेस्सी आणि एमबाप्पे यांच्या गोलची बरोबरी झाली तर काय होईल? फिफा विश्वचषकातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक गोल्डन बूट कुणाला दिला जाणार? यावर फिफाने सोप्या पद्धतीने तोडगा काढण्यासाठी एक नियमावली तयार केली आहे. तांत्रिक समिती यावर निर्णय देते आणि विजेत्याची निवड करते.
अर्जेंटिनाच्या मेस्सीची ही पाचवी तर फ्रान्सच्या एमबाप्पेची दुसरी विश्वचषक स्पर्धा आहे. पण आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू विश्वचषकातील गोल्डन बूट मिळवण्यापासून वंचित राहिले आहेत.
मेस्सी, एमबाप्पेचे संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे दोघांना अजून एक सामना खेळण्याची संधी आहे. अशातच गोल्डन बुट मिळवायचा असेल तर मेस्सी-एमबाप्पे यांना गोल करून परस्परांपुढे जावेच लागेल. मात्र, अंतिम सामन्यात दोघांना गोल करता आला नाही आणि त्यांच्या पाटीवर गोलसंख्या समान राहिली तर काय होईल? असा प्रश्न पडतो. मात्र फिफाच्या नियमानुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडूंचे समान गोल झाले, तर कोणत्या खेळाडूने सर्वात कमी पेनल्टी मारल्या आहेत हे पाहिले जाईल. म्हणजे सर्वात जास्त मैदानी गोल करणाऱ्या खेळाडूला प्राधान्य दिले जाईल.
मेस्सीने या विश्वचषकात 3 वेळा पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले आहे. त्याने नेदरलँड, क्रोएशिया आणि सौदी अरेबियाविरुद्ध पेनल्टीवर गोलजाळे भेदले आहे. तर एम्बाप्पेच्या नावावर असलेले पाचही गोल मैदानी आहेत. त्यामुळे गोल्डन बूटच्या शर्यतीत फ्रेंच खेळाडूचे पारडे जड आहे.
आता जर मेस्सीने फायनलमध्ये गोल केला आणि एमबाप्पे फायनलमध्ये एकही गोल करू शकला नाही, तर मेस्सी आपोआप गोल्डन बूटचा जिंकेल. पण जर पेनल्टी आणि मैदानी गोल दोन्ही बरोबरीत असतील, तर गोल्डन बूट कुणाच्या पदरात पडणार? हाही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संघासाठी गोल करण्यात सर्वाधिक असिस्ट कोणत्या खेळाडूने केले त्याला अव्वल क्रमांक दिला जाईल. अंतिम सामना होईपर्यंत या प्रकारात मेस्सी सरस ठरला आहे. आतापर्यंत त्याने तीन तर एमबाप्पेने दोन गोलमध्ये असिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरम्यान, गोलसंख्या (मैदानी+पेनल्टी), असिस्टची भूमिका यातही समानता राहिली तर सरतेशेवटी कोणता खेळाडू कमी वेळ मैदानावर खेळला यावर निर्णय दिला जाईल.
हा पुरस्कार 1982 मध्ये सुरू करण्यात आला. तेव्हा तो गोल्डन शू म्हणून ओळखला जाऊ लागला. 2010 च्या फिफा विश्वचषकात त्याचे नाव गोल्डन शू वरून गोल्डन बूट असे बदलण्यात आले. आतापर्यंतच्या 21 फिफा विश्वचषक स्पर्धेत 27 खेळाडू गोल्डन बूटचे मानकरी ठरले आहेत. यात ब्राझील (5), जर्मनी (3), अर्जेंटिना (2), हंगेरी (2), इटली (2), इंग्लंड (2), चेकोस्लोवाकिआ (1), फ्रान्स (1), चिली (1), यूगोस्लाविया (1), पोर्तुगाल (1), पोलंड (1), बल्गेरिया (1), क्रोएशिया (1), रशिया (1), कोलंबिया (1) या देशाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा हा पुरस्कार दोन किंवा अधिक खेळाडूंमध्ये विभागून दिला आहे. 1962 साली चिली येथे झालेला स्पर्धेत एकूण सहा खेळाडूंना गोल्डन बूट प्रदान करून गौरविण्यात आले होते. त्या सहा खेळाडूंनी प्रत्येकी 4-4 गोल केले होते. तर अमेरिकेतील 1994 च्या वर्ल्ड कपमध्ये दोन खेळाडूंनी गोल्डन बूटवर नाव कोरले होते. या दोघांनी प्रत्येकी 6-6 गोल डागले होते.
हेही वाचा :