

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या बाराव्या वर्षी एक मुलगी रामायणातील प्रमुख भागावर आधारित कथकली नृत्याने मंत्रमुग्ध होते. आपणही असेच शास्त्रीय नृत्य करावे, असे स्वप्न ती पाहते. आई-वडिल तिचे स्वप्न साकारण्यासाठी प्रोत्साहनाचे 'पंख' तिला देतात आणि इतिहास रचला जातो. ही गोष्ट आहे केरळच्या कलामंडलम येथे कथकली अभ्यासक्रमाला (Kathakali school) प्रवेश घेणारी साबरी एन या मुस्लिम मुलीची. जाणून घेवूया मदरसा ते कथकली शाळा या तिच्या प्रवासाविषयी…
'इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. साबरी ही मूळची कोल्लम जिल्ह्य़ातील एडमुलाक्कल गावातील. ती दोन वर्षांपूर्वी गावातील कथकली सादरीकरण कार्यक्रमास गेली होती. ही नृत्यकला पाहून ती मंत्रमुग्ध झाली. त्या क्षणापासून कथकली नृत्य हाच तिचा ध्यास झाला. मात्र एक मुस्लीम मुलगी पारंपरिक हिंदू नृत्य कलेचे प्रशिक्षण कशी घेणार हा प्रश्न कायम होता.
साबरीने आपले वडील निजाम यांना कथकली नृत्य कलेच्या आवडीबाबत सांगितले. निजाम यांना सुरुवातीला आश्चर्य वाटले. ते फोटोग्राफर आहेत. एडमुलक्कल येथे त्यांचा स्टुडिओ आहे. आपल्या मुलीच्या कथकली शिकण्याचा ध्यास पाहून त्यांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले. आई-वडिलांनी साबरीला कथकली शिकण्यास प्रोत्साहन दिले. सुरुवातीला वडील तिला कथकलीच्या प्रशिक्षणासाठी दर रविवारी अरोमल येथे घेऊन जात असत. यानंतर तिच्या कथकली शिकण्याचा ध्यास पाहून त्यांनी कलामंडलम कला उच्च माध्यमिक विद्यालयात तिला प्रवेश घेण्यास परवानगी दिली.
कथकली केरळ राज्यातील नृत्यशैली आहे. कथकली नृत्याच्या आवडीबद्दल साबरी सांगते की, माझ्या वयाच्या इतर मुस्लिम मुलींप्रमाणे मी हिजाब घालत असे. मी इयत्ता पाचवीपर्यंत मदरशात शिकले. कोरोना साथीनंतर आईने मला घरी शिकवायला सुरुवात केली. रंगीबेरंगी पोशाखांव्यतिरिक्त मला कथकली नृत्य प्रकारातील मुद्रा आणि हावभाव खूपच आवडतात. कथकली शिकण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळेच मी माझे स्वप्नपूर्ण करु शकले, असे साबरी आवर्जून सांगते.
साबरी हिने १९ जून रोजी शिक्षक रविकुमार यांना गुरुदक्षिणा देऊन संस्थेत औपचारिकपणे प्रवेश घेतला. साबरीने कलामंडलम कला उच्च माध्यमिक विद्यालयात आठवीत प्रवेश घेतला आहे. त्रिशूर जिल्ह्यातील चेरुथुरुथी येथील ही १२३ वर्षांपूर्वीची संस्था आहे.
कथकली विभागाचे प्रमुख कलामंडलम रविकुमार यांनी सांगितले की, साबरीचा कथकली नृत्यकला शिकण्याचा निर्णय हा क्रांतिकारक आहे. संस्थेत इतर अभ्यासक्रमांमध्ये काही मुस्लिम विद्यार्थी होते; परंतु पूर्णपणे कथकली नृत्य शिकणारी साबरी ही संस्थेतील पहिली मुस्लिम मुलगी ठरली आहे.
सुरुवातीला साबरी दर रविवारी कथकली शिकण्यासाठी जात असे. आपल्या मुलीची कलेची निवड अपारंपरिक होती. मात्र कथकली नृत्य कला शिकण्यास तिला कोणाचाही विरोध झाला नाही. कथकली शिकण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या देवाची प्रार्थना करण्यास सांगितले, असेही साबरीच्या वडिल नजीम स्पष्ट करतात.
हेही वाचा :