

X ChatGPT Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X.com (अगोदरचे ट्विटर) आणि लोकप्रिय एआय टूल ChatGPT अचानक डाउन झाल्याने जगभरातील यूजर्स मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले. अनेकांना X वर नवीन पोस्ट पाहता येत नव्हत्या, तर काहींना पोस्ट करणेही शक्य होत नव्हते. फक्त ट्विटर किंवा ChatGPTच नव्हे, तर Spotifyसह काही अन्य ऑनलाइन सेवाही काही काळासाठी ठप्प झाल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत.
किती देशांमध्ये किंवा किती मोठ्या प्लॅटफॉर्मवर परिणाम झाला, याबद्दल अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, प्राथमिक तपासात एकच कारण समोर आलं आहे ते असे की, Cloudflare या वेब सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक गडबड झाली आहे.
Cloudflare ही जगातील सर्वात महत्त्वाच्या इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी अशा तंत्रज्ञान सेवा देते ज्या:
वेबसाइट्सला सायबर हल्ल्यांपासून वाचवतात,
अचानक वाढलेल्या ट्रॅफिकमध्येही सर्व्हर बंद पडू देत नाहीत,
आणि वेबपेज लोडिंगचा वेग वाढवतात.
म्हणजेच, जगभरातील लाखो वेबसाइट्स आणि अॅप्स Cloudflare वर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे सर्व्हर डाऊन झाले की अनेक सेवांवर परिणाम होतो.