

एलन मस्क यांच्या स्पेसएक्स (SpaceX) मालकीच्या 'स्टारलिंक' (Starlink) कंपनीने अखेर भारतात नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे आता भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
स्टारलिंकची योजना आहे की, २०२५ वर्षाच्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करावी. कंपनीचा मुख्य ऑपरेशनल बेस बंगळूरु येथे असणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने अकाउंटिंग मॅनेजर, पेमेंट्स मॅनेजर, टॅक्स मॅनेजर अशा अनेक महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्जदार हा भारतातील स्थानिक रहिवासी असावा लागेल आणि त्याला वर्क परमिट (Work Permit) असणे आवश्यक आहे. सेवेच्या लॉन्चिंगपूर्वी भारत सरकारकडून सुरक्षा आणि नियमन (रेग्युलेटरी) संबंधी मंजुरी मिळवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. सरकारने सायबर सुरक्षा तपासण्यासाठी नुकतेच मुंबईत सुरक्षा यंत्रणांसमोर स्टारलिंकच्या नेटवर्कचे डेमो दिले होते.
स्पेसएक्सने मुंबई, चेन्नई आणि नोएडा येथे तीन ग्राउंड स्टेशन्स तयार केले आहेत. लवकरच त्यांची तपासणी होईल. भविष्यात कंपनी भारतात चंदीगड, लखनऊ, कोलकातासह ९ ते १० ठिकाणी विस्तार करणार आहे. कंपनीने मुंबईतील चांदिवली येथे १,२९४ चौरस फूटचे ऑफिस भाड्याने घेतले आहे. स्टारलिंकची सेवा प्रीमियम सेगमेंटमध्ये (उच्च दर्जाच्या) असेल, म्हणजेच ती चांगली स्पीड आणि कमी-विलंबता (Low-Latency) इंटरनेट शोधणाऱ्यांसाठी असेल. वन-टाईम सेटअप फी (एकवेळ शुल्क): अंदाजे 30 ते 35 हजार पर्यंत असू शकते. तर मासिक प्लॅन अंदाजे 3 ते 4 हजार 200 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
भारतात सॅटेलाइट इंटरनेटची शर्यत आता खूप वेगाने वाढत आहे. स्टारलिंकला जिओ सॅटेलाइट (Jio Satellite), वनवेब (OneWeb) आणि अगदी अॅमेझॉनच्या प्रोजेक्ट कुईपर (Project Kuiper) कडून मोठी स्पर्धा मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागाला मिळणार मोठा डिजिटल आधार: स्टारलिंक आणि इतर कंपन्यांच्या आगमनाने, भारतात हाय-स्पीड इंटरनेटची उपलब्धता वाढणार आहे, ज्यामुळे देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील डिजिटल कनेक्टिव्हिटीला एक नवी दिशा मिळेल. एलन मस्क यांची कंपनी बंगळूरुमधून आपले काम सुरू करून पुढील वर्षापर्यंत भारताच्या डिजिटल विकासात मोठे पाऊल उचलणार आहे.