SpaceX च्या रॉकेटवरून अंतराळात झेपावणार भारताची 'AI लॅब'; या 'लक्षवेधी' प्रयोगाचा काय फायदा होणार?

अंतराळातच संकलित माहितीवर 'एआय' प्रक्रिया करण्याबाबतच्या प्रयोगाकडे वेधले सर्वांचे लक्ष
India AI Lab Satellite SpaceX Launch
प्रातिनिधिक छायाचित्र. AI-generated image.
Published on: 
Updated on: 
Summary

हैदराबाद येथील 'टेक मी टू स्पेस' कंपनीचा 'MOI-1A' हा एक संगणकीय उपग्रह स्पेसएक्सच्या (SpaceX) 'फाल्कन ९' रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित केला जाणार आहे.

India AI Lab Satellite SpaceX Launch : भारतीय अंतराळ क्षेत्रात आज (दि. १ ऑक्टोबर) एक लक्षवेधी घटना घडणार आहे. हैदराबाद येथील 'टेक मी टू स्पेस' कंपनीचा 'MOI-1A' हा विशेष उपग्रह स्पेसएक्सच्या (SpaceX) 'फाल्कन ९' रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित केला जाणार आहे. या मोहिमेचे दखल घेण्याचे कारण म्हणजे 'MOI-1A' हा एक संगणकीय उपग्रह म्हणून प्रक्षेपित होणार आहे. याद्वारे, एआय (AI) पृथ्वी-निरीक्षणाच्या माहितीवर अंतराळाच्‍या कक्षेतच प्रक्रिया करून ती प्रसारित करू शकते का, याची चाचणी घेतली जाईल. जाणून घेऊया अंतराळात झेपावणाऱ्या भारताच्या 'AI लॅब'मुळे नेमका काय फायदा होणार आहे याविषयी...

नेमकी कशाची चाचणी घेतली जाणार?

हैदराबादस्थित 'TakeMe2Space' या स्टार्टअपद्वारे विकसित केला जाणारा 'MOI-1A' हा एक कक्षीय संगणकीय उपग्रह आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) तंत्रज्ञान थेट अंतराळातील कक्षेतच पृथ्वी-निरीक्षणाच्या डेटावर प्रक्रिया करून तो पाठवू शकते का? याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, 'सॅटलिओ' (SatLEO) हा उपग्रह देखील स्पेसएक्सच्या फाल्कन ९ यानाद्वारे भारताचा पहिला थर्मल पेलोड 'तापस-१' (TAPAS-1) अंतराळात पाठवणार आहे.

India AI Lab Satellite SpaceX Launch
SpaceX Rocket Crash | स्पेसएक्सच्या रॉकेटच्या धडकेनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर बनले विवर

'AI लॅब'ची संकल्पना काय?

एखादा उपग्रह पृथ्वीचे हजारो फोटो काढतो, पण तो सर्वच्या सर्व फोटो खाली जमिनीवर असलेल्या संगणकांना पाठवत नाही. त्याऐवजी तो तिथे अंतराळातच थांबून स्वतः विचार करतो आणि केवळ गरजेची व महत्त्वाचीच माहिती खाली पृथ्वीवर पाठवतो, ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी 'MOI-1A' नावाचा उपग्रह तयार केला आहे. हा अंतराळातील कक्षेत राहूनच डेटावर प्रक्रिया करणारा उपग्रह आहे. अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, तुमच्या फोनमधील प्रत्येक फोटो दूरच्या संगणकावर पाठवणे आणि त्याऐवजी फोनलाच आधी महत्त्वाचे फोटो ओळखायला सांगणे, असे हा उपग्रह अंतराळात काम करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, अंतराळातच माहितीवर प्रक्रिया करणारा हा भारताचा पहिलाच उपग्रह ठरणार आहे.

अंतराळातील AI लॅबने नेमका काय फायदा होणार?

उपग्रहाच्या माध्यमातून आपण शेती, जंगलांच्या छायाचित्रांपासून पायाभूत सुविधा, जल वाहतुकीचे निरीक्षण अशी विविध माहिती गोळा करू शकतो. आता उपग्रहाने घेतलेली माहिती जेव्हा पृथ्वीवरील डेटा सेंटरमध्ये येते, या ठिकाणी संगणकाद्वारे तिचे विश्लेषण केले जाते. ही प्रक्रिया वेळ खाणारी आहे. तसेच यासाठी मोठ्या प्रमाणात कम्युनिकेशन बँडविड्थची (माहिती वहन क्षमतेची) आवश्यकताही असते. आता हा नवीन प्रयोग म्हणजे पृथ्वीवर होत असलेले प्राथमिक काम थेट अंतराळातच केले जाणार आहे. MOI-1A हा उपग्रह अंतराळातील एक छोटा संगणकच आहे. या उपग्रहात 'Nvidia Orin NX' हे 'एज-कम्प्युटिंग' प्रोसेसर बसवण्यात आले आहेत. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतानाही तो AI मॉडेल्स हाताळू शकतो. या अंतराळयानाचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा कमी आहे.

India AI Lab Satellite SpaceX Launch
ISRO satellite launch: भारताची अंतराळात ‘गरुड’ झेप! EOS-05 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, सीमांवर ठेवणार लक्ष

केवळ उपयुक्त माहितीच पृथ्वीवर पाठवली जाणार

MOI-1A या उपग्रहामुळे केवळ उपयुक्त माहितीच जमिनीवरील केंद्राकडे पाठवली जाईल. उदाहरणार्थ, सर्व प्रतिमांचे संग्रह पृथ्वीवर पाठवण्याऐवजी, एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील विशिष्ट बदल शोधण्यासाठी AI मॉडेलला सूचना दिली जाऊ शकते. TakeMe2Space चे म्हणणे आहे की, ग्राहक विशिष्ट डेटा विश्लेषणासाठी स्वतःचे AI मॉडेल्स अपलोड करू शकतील.

या पूर्वीच्या प्रयोगात काय झालं होतं?

इस्रोच्या PSLV-C60 यानाद्वारे डिसेंबर २०२४ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला MOI-TD हा ऑर्बिटल कम्प्युटिंगची चाचणी घेण्यासाठी तयार करण्यात आला होता. या मोहिमेत २० हून अधिक प्रयोग करण्यात आले होते. मात्र त्याची दोन प्राथमिक उद्दिष्ट्ये— अंतराळातून प्रतिमा टिपणे आणि या प्रतिमांचे 'एआय'द्वारे निष्कर्ष काढणे शक्‍य झाले नाही. सॉफ्टवेअरमधील एका त्रुटीमुळे (बगमुळे) एआयचा प्रयोग थांबवण्यात आला होता.

India AI Lab Satellite SpaceX Launch
ISRO Rocket Launch Cost |जगातील सर्वात महागडी रॉकेट लाँचिंग भारताची: 'कॅम्ब्रिज'चा दावा; इस्रोने दिले सडेतोड उत्तर

प्रयोगासमोरील आव्हाने कोणती?

'टेक मी टू स्पेस' कंपनीचा 'MOI-1A' हा विशेष उपग्रहासमोर मर्यादित ऊर्जा, उष्णता व्यवस्थापन, किरणोत्सर्ग आणि दळणवळणाच्या मर्यादांचे आव्हान असणार आहे. अंतराळातील अत्यंत प्रतिकूल वातावरणात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही कठीण कामे करेल का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. आता त्याच्या यशावरच अंतराळातील एआय कसे काम करेल याचीही परीक्षा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news