

OnePlus Shutting Down In India: वन प्लस ही प्रीमियम स्मार्टफोन कंपनी भारतातील आपले ऑपरेशन बंद करणार असल्याची अफवा पसरली होती. वन प्लस ही कंपनी त्यांची पेरेंट कंपनी ओपोमध्ये मर्ज होणार असे वृत्त अनेक संस्थांनी दिले होते. मात्र यावर आता वन प्लसचे इंडिया CEO रोबिन ल्यू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यावर खुलासा केला आहे.
एक्स प्लॅटफॉर्मवर रोबिन ल्यू यांनी पोस्ट करून भारतातील वन प्लसचे ऑपरेशन बंद होणार ही माहिती चुकीची आहे. असा दावा हा पूर्णपणे खोटा आहे. वन प्लस भारतात आपली सेवा देत राहणार आहे.
ल्यू यांनी एक इमेज पोस्ट केली होती. त्यात वन प्लसचे वक्तव्य छापण्यात आलं आहे. वन प्लसने सांगितले की, 'नुकतेच एक तथ्यहीन बातमी समोर आली होती. त्यात दावा करण्यात आला होता की वन प्लस बंद होणार आहे. ही खूप चुकीची माहिती आहे. OnePlus India चे बिजनेस ऑपरेशन सामान्य स्वरूपात सुरू राहणार आहेत.
नुकतेच काही माध्यामांनी अँड्रॉईड हेडलाईन्सच्या हवाल्यानं सांगितलं होतं की लवकरच वन प्लस आपले इंडियातील ऑपरेशन गुंडाळणार आहे. २०२४ पासून शिपमेंटमध्ये डाऊनफॉल आला आहे. त्यांचे अनेक प्रोडक्ट रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपातील टीमचा आकार देखील कमी करण्यात आला आहे.
वन प्लस हा भारतातील एक प्रसिद्ध ब्रँड आहे. त्यांच्या प्लॅगशिप स्मार्टफोनना भारतात चांगली पसंती मिळते. कंपनीचा भारतात मोठा पोर्टफोलिओ आहे. यात टॅबलेट, टीव्हीएस, स्मार्ट वॉच, स्मार्टफोन यांचा समावेश आहे. यापूर्वी वन प्लस भारतात स्मार्ट टीव्ही देखील विकत होते. मात्र आता कंपनीने ते बंद केलं आहे.
वन प्लसची ओप्पो ही पेरेंट कंपनी आहे. ही कंपनी चीनच्या बीबीके इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपच्या अंतर्गत काम करते. बीबीके इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप अंतर्गत अनेक कंपन्या येतात. त्यात विवो, रिअलमी यासारख्या कंपन्यांचा देखील समावेश आहे.