

लिंगनूर : गावपातळीवर सकारात्मक निर्णय घेणे खूप सोपे असते; पण त्याच्या अंमलबजावणीत लोक मागे पडतात. मात्र आता अभ्यासाचा भोंगा वाजवून सायंकाळी सात ते नऊ वाजता भरारी पथक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची थेट घरी जाऊन पाहणीच करत आहे. तसेच यातून आम्ही अंमलबजावणीत सुद्धा सहजासहजी कमी पडणार नाही, हे येथील गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
या पथकात माजी सरपंच मारुती पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवदास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे, पालक अंकुश सोनुरे, वरिष्ठ मुख्याध्यापक आरगे, राजू मगदूम, सी. एम. मगदूम, महादेव गुरव, पदाधिकारी, शाळा समितीचे अध्यक्ष मीलन नागणे, मुख्याध्यापक हणमंत आरगे, परशुराम जाधव यांचा समावेश आहे.
अभ्यासाचा भोंगा या उपक्रमांतर्गत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत भोंगा झाल्यानंतर मुलांचा अभ्यास पाहण्यासाठी पथकाने गृहभेटी दिल्या. दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद करून विद्यार्थी व पालकांना अभ्यास करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यासाठी आवाहन करण्यात आले. बरेच विद्यार्थी या वेळेत अभ्यास करत असल्याचे या भेटीवेळी आढळून आले, तर या वेळेत अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या.