

टेक न्यूज : ब्रिटन, भारत, इंडोनेशिया, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये लोक आपला बराच वेळ मोबाईलवर घालवत आहेत. एका ताज्या सर्वेक्षणाने ब्रिटनमधील मोबाईल वापराची आकडेवारी समोर आणली आहे, पण यातून भारतीयांच्या मोबाईल वापराच्या सवयींवरही प्रकाश टाकला आहे.
रील्सच्या जमान्यात, जग दिवस-रात्र मोबाईलमध्ये व्यस्त आहे. एका नवीन अहवालानुसार, लोक सरासरी किती वेळ स्मार्टफोनवर घालवतात याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. हा अहवाल ब्रिटनच्या संदर्भात असला तरी, तो भारतीयांच्या सवयींवरही प्रकाश टाकतो. चला जाणून घेऊया कोण मोबाईलवर किती वेळ घालवत आहे.
ब्रिटनच्या इन्स्टिट्यूट ऑफ प्रॅक्टिशनर्स इन ॲडव्हर्टायझिंगने (IPA) केलेल्या सर्वेक्षणात ६,४१६ प्रौढ व्यक्तींनी भाग घेतला. यातून असे दिसून आले की, ब्रिटनमधील लोक दिवसाला सरासरी ३ तास २१ मिनिटे मोबाईलवर घालवतात. ही आकडेवारी धक्कादायक आहे कारण २०१५ मध्ये हेच प्रमाण फक्त १ तास १७ मिनिटे होते.
अहवालानुसार, ब्रिटनमधील प्रौढांचा एकूण स्क्रीन टाइम (मोबाइल, टीव्ही आणि इतर गॅझेट्ससह) वाढून ७ तास २७ मिनिटे झाला आहे, जो दशकभरापूर्वीच्या वेळेपेक्षा ५१ मिनिटांनी जास्त आहे. विशेष म्हणजे, तरुण पिढी आपला जास्त वेळ फोनवर घालवत आहे, तर वृद्ध पिढी टीव्हीसमोर बसून राहते. यामुळे दोन्ही पिढ्यांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे.
१५ ते २४ वर्षे वयोगटातील युवक-युवती दिवसातून सरासरी ४ तास ४९ मिनिटं स्मार्टफोनवर घालवतात. त्यात बहुतांश वेळ सोशल मीडियावर जातो.
६५ ते ७४ वर्षे वयोगटातील नागरिक मोबाईलवर दिवसातून १ तास ४७ मिनिटं घालवतात, पण ते रोज ४ तास ४० मिनिटं टीव्ही समोर बसतात.
मोबाईल वापरामुळे तरुण पिढीमध्ये कंटेंटच्या वापरात वाढ झाली असून, वयोवृद्ध टीव्हीकडे अधिक झुकतात. यामुळे दोन पिढ्यांमध्ये डिजिटल अंतर वाढत आहे.
भारत या शर्यतीत सर्वांपेक्षा पुढे आहे. 'ईटी'च्या एका रिपोर्टनुसार, भारतीय नागरिक दिवसातून सरासरी ५ तास मोबाईल स्क्रीनसमोर घालवतात. यातील ७०% वेळ सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्यात जातो. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये भारतीयांनी एकूण १.१ लाख कोटी तास मोबाईल स्क्रीनकडे पाहण्यात घालवले. मेट्रोमधील प्रवास असो किंवा रस्त्यावरील वेटिंग सगळीकडे लोक मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात.
भारतात मोबाईल वापर जरी प्रचंड वाढला असला, तरी या बाबतीत इंडोनेशिया आणि ब्राझील भारतापेक्षाही पुढे आहेत. त्यामुळे मोबाईल वापराच्या सवयीने आज जगभरात डिजिटल आरोग्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.