

Maruti GST Price Cut :
देशातील सर्वात मोठा मार्केट शेअर असणारी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीनं आपल्या दोन मॉडेल्सच्या किंमतीत मोठी घट केली आहे. ही घट नवीन जीएसटी दर लागू झाल्यावर करण्यात आली आहे. मारूती सुझुकीनं आपल्या S-Presso च्या किंमतीत जवळपास १ लाख २९ हजार ६०० रूपयांची घट केली आहे. त्यामुळं आता S-Presso ही गाडीची किंमत ही फक्त ३.५० लाखापासून सुरू होणार आहे.
दुसरीकडं मारूती सुझुकीनं आपल्या अनेक गाड्यांच्या किंमतीत मोठी घट केल्याचं जाहीर केलं. कंपनीची चांगली खपणारी मारूती वॅगनर, अल्टो, इग्निस या गाड्यांच्या किंमती जवळपास १ लाख २९ हजार रूपयांनी कमी झाल्या आहेत. या नव्या किंमती येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
मारूती सुझुकीनं अधिकृत वक्तव्यात म्हटलं आहे की, नुकतेच केंद्र सरकारनं जीएसटीच्या दरात सुधारणा केली आहे. त्याचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहचवला जावा असं देखील सरकारनं सांगितलं होतं. त्याप्रमाणे आमच्या कंपनीनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये असणाऱ्या अनेक मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत.
मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या मार्केटिंग आणि सेल्स विभागाच्या वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मारूतीनं आपल्या अनेक मॉडेल्सच्या किंमती सुधारित जीएसटी दरांअनुसार कमी केल्या आहेत. मात्र जरी मारूतीच्या गाड्या स्वस्त झाल्या असल्या तरी त्याच्या फिचर्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.