

नवी दिल्ली: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence - AI) जगात भारत लवकरच आपली नवी ओळख निर्माण करणार आहे. सरकारने घोषणा केली आहे की, देशाचा पहिला 'स्वदेशी AI मॉडेल' फेब्रुवारी २०२६ पूर्वीच लॉन्च केले जाईल. हे मॉडेल पूर्णपणे भारतीय डेटावर आधारित असेल आणि भारतीय सर्व्हरवरच (Server) विकसित केले जाईल.
देशातील डेटा देशातच सुरक्षित ठेवणे.
AI क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवणे.
भारताचे 'स्वदेशी AI मॉडेल' फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट'च्या (India AI Impact Summit) आधी लॉन्च करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. भारतीय कंपन्या आणि सरकारी सर्व्हरवर याचे काम चालू आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, AI क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. सुरुवातीला १०,००० GPUचे (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) उद्दिष्ट होते, पण आतापर्यंत ३८,००० GPU चा वापर सुरू झाला आहे. हे GPU AI मॉडेलच्या ट्रेनिंगसाठी आणि रिसर्चसाठी खूप महत्त्वाचे असतात. भारतीय कंपन्यांना अधिक संसाधने देण्यासाठी सरकार सतत GPU ची क्षमता वाढवत आहे.
हा स्वदेशी AI मॉडेल पूर्णपणे भारतीय डेटा सेटवर (Data Set) प्रशिक्षित केला जाईल आणि भारतीय सर्व्हरवरच होस्ट (Host) होईल. यामुळे देशवासीयांचा डेटा सुरक्षित राहील आणि त्यांची प्रायव्हसी (Privacy) जपली जाईल. सरकार या प्रोजेक्टमध्ये १२ भारतीय कंपन्यांना मदत करत आहे, त्यापैकी दोन कंपन्यांकडून या वर्षाच्या अखेरीस त्यांचे स्वतःचे फाउंडेशनल मॉडेल (Foundational Model) तयार होण्याची अपेक्षा आहे.
स्वदेशी AI सोबतच स्वदेशी GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) बनवण्याचे लक्ष्यही सरकारने ठेवले आहे. हे काम 'सेमीकंडक्टर मिशन २.०' (Semiconductor Mission 2.0) अंतर्गत केले जाईल. यामुळे AI क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल पडेल.