

OpenAI Faces Legal Action After Reports: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) जग बदलत आहे, पण त्यासोबत काही अनपेक्षित धोकेही समोर येत आहेत. अमेरिकेत आता OpenAI च्या ChatGPT वर अत्यंत गंभीर आरोप केले गेले आहेत. दोन सामाजिक संस्थांनी आणि एका मुलाने न्यायालयात खटला दाखल करत आरोप केला आहे की, या AI चॅटबॉटने युजर्सला मानसिकदृष्ट्या अस्थिर केले आहे आणि जीवन संपवण्यास प्रवृत्त केले आहे.
या खटल्याचं प्रतिनिधित्व सहा प्रौढ आणि एक किशोरवयीन मुलगा करत आहे. या सात प्रकरणांपैकी चार जणांनी जीवन संपवल्याचा दावा केला आहे. आरोपानुसार, OpenAI ने GPT-4oचे नवे मॉडेल आवश्यक चाचण्या पूर्ण न करता बाजारात आणले आहे. तज्ञांचा दावा आहे की, यामुळे मानसिकदृष्ट्या संवेदनशील लोकांवर नकारात्मक परिणाम झाला.
या वर्षी ऑगस्ट महिन्यातच कॅलिफोर्नियातील 16 वर्षीय अॅडम रेनच्या पालकांनी OpenAI आणि त्यांचे CEO सॅम ऑल्टमन यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ChatGPT ने त्या मुलाला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केले.
सर्वात चर्चेतील प्रकरण 17 वर्षीय अमॉरी लेसीचं आहे. त्याच्या कुटुंबाच्या मते, तो ChatGPT वर मदतीचा सल्ला घेण्यासाठी गेला होता, पण या चॅटबॉटने त्याचं मानसिक संतुलन आणखी बिघडवलं. वकीलांचं म्हणणं आहे की, OpenAI ने नफा आणि स्पर्धेच्या घाईत उत्पादन बाजारात आणलं, पण मानसिक सुरक्षेच्या चाचण्या केल्या नाही.
कॅनडातील 48 वर्षीय अॅलन ब्रूक्स यांनीही ChatGPT विरोधात तक्रार केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, दोन वर्षांपर्यंत हे साधन नेहमीप्रमाणे काम करत होतं, पण नंतर त्याचं वर्तन बदललं आणि त्यातून त्यांच्या भावनिक तसेच आर्थिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाला.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, AI सिस्टिम काहीवेळा युजर्सच्या भाषेचा चुकीचा अर्थ लावून संवेदनशील परिस्थितीत चुकीची माहिती देते. त्यामुळे अमेरिकेत आता मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की “मानवसदृश AI बनवण्याच्या स्पर्धेत, कंपन्या त्यांची नैतिक जबाबदारी विसरतायत का?”
सोशल मीडिया विक्टिम्स लॉ सेंटरचे संस्थापक वकील मॅथ्यू पी. बर्गमन म्हणतात, “हे खटले केवळ नुकसानभरपाईबद्दल नाहीत, तर जबाबदारीबद्दल आहेत. ChatGPT सारख्या साधनांनी माणूस आणि यंत्र यांच्यातील सीमारेषा पुसून टाकली आहे आणि हे सगळं केवळ बाजारात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी केलं गेलं.” OpenAI ने या घटनांबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “ही प्रकरणं अत्यंत दु:खद आहेत, आणि आम्ही न्यायालयीन कागदपत्रं तपासत आहोत.”