

नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) जागतिक शर्यतीत भारताने मोठी झेप घेतली आहे. अमेरिका आणि चीनच्या शक्तिशाली AI सर्च इंजिनला आव्हान देण्यासाठी भारताने आपला पूर्णपणे स्वदेशी AI चॅटबॉट 'काइवेक्स' (Kyvex) बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे, ChatGPT प्रमाणेच हा भारतीय AI चॅटबॉट पूर्णपणे विनामूल्य वापरता येणार आहे.
स्वदेशी बनावट: 'काइवेक्स'ची निर्मिती १००% भारतीय अभियंते आणि संशोधकांनी केली आहे. यासाठी कोणतीही परदेशी मदत घेण्यात आलेली नाही, जे भारताच्या तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन करते.
डीप रिसर्चवर लक्ष: हा AI असिस्टंट कंपनीच्या स्वतःच्या लार्ज लँग्वेज मॉडेलवर चालतो आणि तो सखोल संशोधन (Deep Research) व माहितीवर लक्ष केंद्रित करून अचूक आणि सखोल उत्तरे देतो.
सर्वांसाठी मोफत: शिक्षणापासून ते संशोधन आणि दैनंदिन कामाकाजापर्यंत, 'काइवेक्स' सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. AI सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
माजी IIT प्रमुखांचा पाठिंबा: आयआयटी दिल्लीचे माजी संचालक प्रो. रामगोपाल राव, आयआयटी खड़गपूरचे माजी संचालक प्रो. पी.पी. चक्रवर्ती आणि आयआयआयटी हैदराबादचे संचालक पी.जे. नारायणन यांसारख्या देशातील मोठ्या शिक्षणतज्ज्ञांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.
सध्या AI च्या जगात अमेरिका (ChatGPT, Grok, Perplexity) आणि चीन (Deepseek) यांचा दबदबा आहे. मात्र, 'काइवेक्स'च्या आगमनाने या दोन्ही देशांना एका तिसऱ्या आणि महत्त्वाच्या खेळाडूशी स्पर्धा करावी लागणार आहे. संस्थापक आणि सीईओ पर्ल कपूर यांच्या मते, 'काइवेक्स' ही भारतासाठी भविष्यातील मोठी झेप आहे आणि याचा उद्देश भारताला AI मध्ये जागतिक नेता बनवणे आहे.
सध्या 'काइवेक्स' वेबवर उपलब्ध आहे. लवकरच याचे अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) ॲप्स बाजारात येणार आहेत. यामुळे भारतात आणि जगभरात त्याचा वापर वाढण्यास मदत होईल. भारताच्या स्टार्टअप जगात ही घडामोड 'डीप टेक'मध्ये (Deep Tech) भारताचे नेतृत्व वाढवणारी ठरू शकते.