

Latvia Husband For Rent: युरोपातील अनेक देशात अजब काहीतरी सुरू असतं. इकडं आशिया खंडात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी मोहिमा सुरू आहेत तिकडं लोकसंख्या वाढवण्यासाठी लोकांना प्रलोभन दिले जात आहेत. अशाच एका युरोपियन देशात एक अजब परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या महिलांवर आता पती भाड्यानं घेण्याची वेळी आली आहे.
युरोपातील लातव्हिया या देशात मोठ्या प्रमाणावर लिंग गुणोत्तर असमानता निर्माण झाली आहे. त्यामुळं या देशातील महिला या तात्पुरत्या स्वरूपात पतीच भाड्यानं घेत आहेत. याबाबतचं वृत्त द न्यू यॉर्क पोस्टनं दिलं आहे. युरोस्टॅटच्या माहितीनुसार लातव्हिया या देशात पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण हे तब्बल १५.५ टक्क्यांनी जास्त आहे. ही असमानता युरोपियन युनियनमधील इतर देशांच्या तुलनेत तिप्पट आहे.
या देशात ६५ वर्षाच्या वरील लोकांचा विचार केला तर हेच लिंग गुणोत्तर असमानतेचे प्रमाण हे दुप्पट आहे. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार पुरूषांची कमतरता ही या देशात कामाच्या ठिकाणी सहज दिसून येते. डायना या फेस्टिव्हल शॉपीमध्ये काम करणाऱ्या महिलेनं सांगितलं की तिच्या सर्व सहकारी या महिला आहेत. डायनाची मैत्रिण झाने म्हणाली की अनेक महिला या पार्टनर मिळवण्यासाठी परदेशात गेल्या आहेत कारण या देशात खूप कमी ऑप्शन आहेत.
लातव्हिया देशातील महिलांना रोजच्या आयुष्यात घरातील छोटी मोठी कामे करताना खूप अडचणी येतात. त्यामुळे या महिला या कामांसाठी पुरूषांना हायर करतात. यासाठी ऑनलाईन अन् ऑफलाईन दोन्ही सेवा पुरवणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याद्वारे या महिला प्लम्बिंग, सुतार काम, पेंटिंग, दुरूस्तीचं काम, टेलिव्हिजन इन्स्टॉलेशनचं काम करून घेतात. अशाही काही सेवा उपलब्ध आहेत जिथं महिला एका तासासाठी आपला पती भाड्यानं घेऊ शकतात. ते येऊन पेंटिंग, गार्डनिंग, पडदे लावून देण्यासारखी मेंटेनन्सची कामे करून जातात.
जाणकारांच्या मते लातव्हियामध्ये लिंग गुणोत्तर असमानता ही पुरूषांचे आयुर्मान महिलांपेक्षा कमी असल्यामुळं निर्माण झाली आहे. पुरूषांमध्ये जास्त स्मोकिंग रेट असतो तसेच लाईफस्टाईल संदर्भातील आरोग्याच्या समस्यांचे देखील मोठे आहे. वर्ल्ड अॅटलास नुसार लातव्हिया देशातील ३१ टक्के पुरूष हे धुम्रपान करतात. तर लातव्हियातील फक्त १० टक्के महिला या धुम्रपान करतात. पुरूषांमध्ये लठ्ठपणाची समस्या देखील मोठी आहे.
विशेष म्हणजे पती भाड्यानं घेण्याचा ट्रेंड हा फक्त लातव्हियापुरता मर्यादित नाही. तर युकेमधील लौरा यंग यांनी २०२२ मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा पती जेम्स याला भाड्यावर दिलं होतं. रेंट माय हँडी हसबंड असं म्हणत त्यांनी व्यवसायच सुरू केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे जेम्स यांचे बुकिंग फुल झाले होते. ते घरातील विविध कामांसाठी तास किंवा दिवसावर पैसे घेत होते.