

Fraud In Cricket Pondicherry: जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा दबदबा सर्वश्रूत आहे. असं म्हणतात की जगातील क्रिकेटचा गाडा हा एकटा बीसीसीआय खेचतोय. आयपीएल सारख्या पैशांचा पाऊस पाडणाऱ्या लीग. टीम सिलेक्शनचे कडक निकष. त्यात देशातील चाहत्यांचे क्रिकेटवरचं अतोनात प्रेम... यामुळं भारतीय क्रिकेट जगात भारी झालं आहे. मात्र पुदुचेरी क्रिकेट विश्व वेगळ्याच दिशेला जात आहे.
पुदुचेरी क्रिकेट विश्वात खोटे पत्ते तयार करून त्या आधारे खोटी आधार कार्ड तयार केली जातात. एक समांतर व्यवस्था कार्यरत आहे. हे सर्व पाँडेचेरी क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयच्या अपरोक्ष होत आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत तीन महिन्यापासून शोध पत्रकारिता केली आहे. त्यात काही आश्चर्यकारक अन् धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
इंडियन एक्सप्रेसनं तपासात २ हजार पेक्षा जास्त खेळाडूंचे फॉर्म चेक केले. अनेक खेळाडूंसोबत प्रत्यक्ष चर्चा केली. अनेक पत्त्यांवर स्वतः जाऊन चौकशी केली. या चौकशीत १.२ लाख रूपये घेऊन बाहेरच्या खेळाडूंना स्थानिक खेळाडू बनवलं जात होतं.
कोच आणि खासगी क्रिकेट अकॅडमी खेळाडूंना खोटे पत्ते, जुनी तारीख दाखवून कॉलेजमध्ये प्रवेश नकली जॉब रेकॉर्ड तयार करून देत होते. बीसीसीआयच्या नियमानुसार तुम्ही स्थानिक खेळाडू म्हणून गणले जाण्यासाठी तिथं एक वर्ष राहणं गरजेचं आहे. ही कागदी कार्यवाही कोच आणि अकॅडमी कागदोपत्रीच पूर्ण करून देत होती. यानंतर बाहेरच्या खेळाडूंना CAP च्या संघात थेट प्रवेश दिला जात होता.
बाहेरच्या राज्यातील खेळाडूंसाठी बीसीसीआयच्या एक वर्षे रहिवासी असण्याच्या नियमाला बगल देण्यासाठी १.२ लाख रूपये किंवा त्यापेक्षा जास्तीचं पॅकेज आकारलं जात आहे. स्थानिक क्रिकेट अकॅडमीचे कोचेस निवासी प्रमाणपत्र विकत आहेत. त्यात खोटं आधार कार्ड पत्ते, बॅक डेटेड शैक्षणिक संस्थांचे दाखले, खोटे नोकरीचे रेकॉर्ड यांचा वापर केला जात आहे.
पैसे देणाऱ्या खेळाडूंना थेट पाँडेचेरी क्रिकेट असोसिएशन (CAP) संघात लगेचच स्थान मिळत आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे बाहेरचे खेळाडू रणजी ट्रॉफी सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये देखील खेळत आहेत.
या सर्व गोंधळात एक आश्चर्यकारक पुरावा समोर आला आहे. पुडुचेरीच्या विविध संघातील १७ कथित स्थानिक खेळाडूंचा मुलाकुलमच्या मोतीलाल नगरचा एकच आधार पत्त्याचा उपयोग केला गेला आहे. इथं चौकशी केली असता घर मालकाने भाडेकरूने अनेक महिन्यांपासून भाडं दिलं नाही म्हणून त्यांना काढून टाकलं असल्याचं सांगितलं.
पुदुचेरी क्रिकेट वर्तुळात ही समांतर व्यवस्था निर्माण झाल्यानं त्याचा फटका खऱ्या स्थानिक खेळाडूंना होत आहे. त्यांची संघाकडून खेळण्याची संधी हिरावून घेतली जात आहे.
गेल्या चार वर्षात पुदुचेरी कडून खेळल्या गेलेल्या २९ रणजी सामन्यात केवळ पाच पुदुचेरीमध्ये जन्म झालेल्या खेळाडूंनी राज्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. विशेष म्हणजे १९ वर्षाखालील विनू मंकड ट्रॉफीमध्ये पुदुचेरीच्या संघातील ११ खेळाडूंपैकी ९ खेळाडू हे दुसऱ्या राज्यातील होते. त्यांना स्थानिकच लेबल चिकटवून खेळवण्यात आलं होतं.
रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना मॅच फीमधून एका ज्युनिअर खेळाडूला हंगामात ११.२ लाख रूपयांपर्यंत कमाई करता येते. त्याचबरोबर आयपीएलचे द्वार देखील उघडले जाते.
दरम्यान, पुदुचेरी प्रीमियर लीग २०२५ मध्ये बाहेरच्या खेळाडूंना प्रवेश दिला त्याचा विरोध करण्याऱ्या खेळाडूंवरच कारवाई करण्यात आली. त्यांना पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनमधून बॅन करण्यात आलं.
दरम्यान, पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव व्यंकटरामन यांनी या आरोपांचे खंडन केले अशून राज्य संघ आधार आणि पॅन कार्ड यासारख्या सरकारी दस्तऐवजांचे क्रॉस चेकिंग करण्यासाठी जबाबदार नाही. हे सर्व डॉक्युमेंट बीसीसीआयकडे तपासणीसाठी पाठवले जातात असं सांगितलं.