Khandenavami 2023 : शौर्यशाली वारसा सांगणारे शस्त्रागार…

नवरात्र उत्सवातील महानवमी तिथीला खंडेनवमी म्हटले जाते. 'खंडे'चा मूळ शब्द खांडा म्हणजेच खड्ग किंवा तलवार होय. सैनिकी परंपरा जपणारे किंवा शस्त्रास्त्रे धारण करणारे सर्व समाज खंडेनवमीचा सण साजरा करतात. शौर्यशाली परंपरेचा वारसा सांगणारे अनेक शस्त्रागार 'देशभरात आहेत. 'शाहूनगरी' कोल्हापुरातील न्यू पॅलेसमधील छत्रपती शहाजी वस्तुसंग्रहालय आणि टाऊन हॉल उद्यानातील कोल्हापूर वस्तू संग्रहालयातील शस्त्रागार लक्षवेधी आहेत. खंडेनवमीनिमित्त या शस्त्रागारांबद्दल थोडे….. (Khandenavami 2023)

टाऊन हॉल संग्रहालयातील शस्त्रदालन

इसवी सन १९४५-४६ च्या दरम्यान कोल्हापुरातील प्राचीन ब्रम्हपुरी टेकडीवर कोल्हापूर संस्थानचा पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेज पुणे यांच्या वतीने उत्खनन करण्यात आले. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे जतन कोठे करायचे? या प्रश्नातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली आणि ३० जानेवारी १९४६ ला कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. १९४९ मध्ये टाऊन हॉल उद्यानातील 'कोल्हापूर नगर मंदिर' येथे हे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आले. कोल्हापुर नगर मंदिर (टाऊन हॉल) ही वास्तू इसवी सन १८७२ ते ७६ या कालावधीत रॉयल इंजिनिअर सी मॉट यांच्या देखरेखेखाली गाँधीक वास्तूशास्त्रानुसार बांधण्यात आली. सार्वजनिक कारभारासाठी याचा वापर होत होता.

संग्रहालयात पुरातत्त्व दालन, धातू वस्तू दालन, शिल्प दालन, संकीर्ण दालन, व्यक्तिचित्र दालन, पुतळे दालन यासह शस्त्रास्त्र दालनाचाही समावेश आहे. शस्त्रास्त्रे दालनात मध्ययुगापासूनची प्रहार आणि संरक्षण करणारी शस्त्रास्त्रे आहेत. यात तोफा, तोफगोळे, तलवारी, ढाली, बंदुका, भाले आदींचा समावेश आहे. न्यू पॅलेस संग्रहालयातील शस्त्रागार छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व लोकांना कळावे आणि लोकराजा राजर्षी शाहू महारांच्या कार्याच्या स्मृती अखंड राहाव्यात, या उद्देशाने छत्रपती शहाजी महाराजांनी नव्या राजवाड्यात
शहाजी छत्रपती म्युझियमची स्थापना केली.

राजर्षी शाहू महाराजांच्या जन्म शताब्दीनिमित्त ३० जून १९७४ रोजी हर हायनेस सौ. प्रमिलाराजे छत्रपती महाराणीसाहेब यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. संग्रहालय १२ दालनात विभागले आहे. यात प्रवेश दालन, अंबारीचे दालन, मिरवणुकीतील वस्तूंचे दालन, छत्रपती दालन, छत्रपती शाहू दालन, संकीर्ण कलाकृती दालन, ऐतिहासिक चित्र दालन, कलात्मक चित्र दालन, दरबार हॉल, लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती दालन, शिकार दालन यासह शस्त्रास्त्र दालनाचा समावेश आहे. शस्त्रास्त्र दालन संग्रहालयातील महत्त्वाचा भाग असून यात शिवकालापासूनच्या विविध प्रकारच्या तलवारी, पट्टा, दांड, भाले, कट्यारी, खंजीर, धनुष्यबाण, कुल्हाड़ी, बाणा, विटा, गुर्ज, वाघनखे, चिलखते, सैनिकी पोशाख, तोफा, बंदुका, साठमारीची हत्यारे अशा लहान-मोठ्या शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. (Khandenavami 2023)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news