

हल्ली स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह ( Microwave ) असावा, ही बर्याच गृहिणींची इच्छा असते. मात्र, दुसरीकडे अनेक जणींना मायक्रोवेव्हचा उपयोग केवळ अन्न गरम करण्यासाठीच असतो, असे वाटत असते. पुरेशा माहितीच्या अभावामुळे मायक्रोवेव्हच्या उपयोगाची पूर्ण माहिती त्यांना नसते. म्हणूनच मायक्रोवेव्ह वापरताना त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ करताना त्यासाठी अॅल्युमिनियम, प्लास्टिक, स्टील यासारख्या भांड्यांचा वापर कटाक्षाने टाळावा. कारण, ही भांडी मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यास वाकडी होण्याची शक्यता असते. शिवाय, मायक्रोवेव्हदेखील खराब होऊ शकतो. बाजारात विशेष प्रकारची काचेची भांडी मिळतात. ती मायक्रोवेव्हप्रूफ असतात. त्यामुळे याच भांड्यांचा वापर शक्यतो करावा.
मायक्रोवेव्हमध्ये तापमान सेंटिग्रेडमध्ये दिलेले असते. जास्तीत जास्त तापमान 900 सेंटिग्रेडपर्यंत असते. यामध्ये तापमानाच्या श्रेणी अशा असतात. 900 म्हणजे सर्वोच्च, 700 उच्च, 450 मध्यम आणि 300 ते 180 कमी, असे हे प्रमाण असते. एखाद्या रेसिपीसाठी सर्वोच्च तापमान हवे असल्यास सर्वोच्च तापमानातून 50 वजा करून जे तापमान येईल, तेवढ्या सेंटिग्रेडला पदार्थ शिजवावा. काही मायक्रोवेव्हमध्ये तापमान हे फॅरेनहाईट या एककात दिलेले असते. यानुसार 100 डिग्री हे सर्वोच्च, 80 डिग्री उच्च, 60 हे मध्यम, तर 40 ते 20 हे कमी अशाप्रकारचे प्रमाण असते. यामध्येही सर्वोच्च तापमानावर अन्न शिजवताना वजा 50 करून शिजवावे. म्हणजे 50 डिग्रीवर शिजवावे.
मायक्रोवेव्हमध्ये काही प्रकारचे अन्न शिजवताना कशाप्रकारे शिजवायचे हे बघू. पाव किलो हिरव्या भाज्या शिजवताना त्या पाणी न टाकता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवाव्यात. भाज्यांचे प्रमाण दुप्पट असल्यास वेळ दुप्पट न करता केवळ एक मिनिट जास्त ठेवावे.
बटाटे शिजवताना चार बटाटे एका पॉलिथीनमध्ये ठेवून त्याला दोन-तीन छिद्रे पाडावीत. एक चमचा पाणी घालून पाच मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. बटाटे, गाजर, रताळी, बीन्स यासारख्या भाज्या शिजवताना दिलेल्या वेळेआधी कधीही मायक्रोवेव्ह उघडू नये.
मसाल्याचा रस्सा तयार करण्यासाठी एक चमचा तेल घालून कांदे, टोमॅटो, आले, लसूण यांची पेस्ट त्यामध्ये दोन मिनिटे ठेवावी. नंतर त्यात टोमॅटोची प्युरी घालून आणि इतर साहित्य घालून तीन ते चार मिनिटे ठेवावी. म्हणजे भाजी चांगली होते.
मेथी, पुदिना यासारख्या हिरव्या भाज्या वर्षभर साठवून ठेवायच्या असतील, तर एक किलो मेथी टर्नटेबलवर पसरवून पाच मिनिटांपर्यंत मायक्रो करावी. ओव्हन उघडून नंतर पुन्हा ते सुरू करावे. अशाप्रकारे पाच-पाच मिनिटे वेळ देऊन त्यातील पाणी पूर्णपणे वाळवावे. त्यासाठी 12 ते 15 मिनिटे लागतात. अशी भाजी वर्षभर केव्हाही वापरता येते.
शेंगदाणे, मुरमुरे किंवा इतर कोणतीही चिक्की बनवताना एक वाटी गूळ, एक चमचा तूप एकत्र करून चार मिनिटे मायक्रो उच्च तापमानावर ठेवावे. नंतर सव्वा वाटी हवा तो पदार्थ घालून मिश्रण एकजीव करावे आणि चिक्क्या पाडाव्यात.
हेही वाचा :