Hairstyle : अश्शी हेअरस्टाईल सुरेख बाई! | पुढारी

Hairstyle : अश्शी हेअरस्टाईल सुरेख बाई!

सावनी बेलसरे

स्टाईलिश दिसायचं असेल तर कपड्यांसोबतच हेअरस्टाईलकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. अनेकदा आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स पाहतो; परंतु आपले केस त्या स्टाईल्स करण्यासाठी अनुरूप नसतात. पण, म्हणून काही निराश व्हायचं नाही. आपल्या केसांच्या लांबीनुसारही फॅशनेबल हेअरस्टाईल निवडता येतात. (Hairstyle)

लांब केसांसाठी

केस लांब असतील तर लाँग आणि बाऊन्सी हा प्रकार खूप छान दिसतो. यामध्ये हेअर कलर कुठलाही असला तरीही तो चांगला दिसतो. या स्टाईलमध्ये केसात सॉफ्ट वेव्हज् दिसतात. केसांवर शार्प वेव्हज् असतील, तर हेअरस्टाईल चांगली दिसत नाही. हाफअप, हाफआऊट ही हेअरस्टाईल लहान चेहरा असणार्‍या महिलांना जास्त चांगली दिसते. यामध्ये सर्वात प्रथम केसांचे मधून दोन भाग करावेत. नंतर पुढचे काही केस सोडून मधल्या केसांना लाईट पफ देऊन, मागच्या बाजूने पिनअप करावे. मीडपार्टिंग स्वच्छपणे दिसू शकेल यासाठी पुढून केस सोडले जातात. पुढे सोडलेले केस दोन्ही बाजूंनी मोकळे सोडावेत. ही हेअरस्टाईल आपल्याला अत्याधुनिक लूक देते.

लूप्ड पोनीटेल हा हेअरस्टाईलचा पर्यायदेखील आपण निवडू शकतो. ही स्टाईल पोनीटेल फोल्ड करून बनवली जाते. मागून एखाद्या झुपक्याप्रमाणे अथवा आंबाड्याप्रमाणे ही स्टाईल दिसते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पेडांची वेणीदेखील आपण घालू शकतो.

मध्यम लांबीच्या केसांसाठी

केसांची लांबी मध्यम असल्यास सध्या फॉक्सबॉब ही स्टाईल चर्चेत आहे. पुढून, मागून आणि दोन्ही बाजूनेही ही हेअरस्टाईल आकर्षक दिसते. ही हेअरस्टाईल बनवण्यासाठी सर्वप्रथम केस स्ट्रेटनिंग मशिनने सरळ करून घ्यावेत. त्यानंतर दोन भागांत विभागावेत. वरच्या केसांच्या भागात क्लिप लावावी. नंतर बाजूचे काही केस घेऊन डोक्याच्या मध्यभागी पिनअप करावेत. अशाच प्रकारे दुसर्‍या बाजूनेही केस पिनअप करावेत. त्यानंतर केसांच्या खालचा भाग आतल्या बाजूने वळवून तेथे पिन लावावी. सुरुवातीला वरच्या ज्या केसांना क्लिप लावली असेल ते केसदेखील मागच्या बाजूला घ्यावेत आणि खालून आतल्या बाजूने फोल्ड केेलेल्या केसांमध्ये मिसळावेत. यामध्ये पिन लावताना ती दिसणार नाही याची काळजी घ्यावी.

मध्यम केसांच्या हेअरस्टाईलमध्ये वेटलूक हा प्रकार स्टायलिश दिसतो. ही हेअरस्टाईल मात्र चांगल्या पार्लरमध्ये जाऊनच करावी. कलर केलेल्या केसांवरही ही स्टाईल चांगली दिसते. यामध्ये केसांचे पार्टिंग केल्यास चांगले दिसत नाही. यामध्ये पोनीटेल बनवून ती खांद्यावर ठेवता येऊ शकते. काही वेगळं करायचं असल्यास स्वीपिंग वेव्हज् बनवता येऊ शकतात. यामध्ये केसांचे साईड पाटिंग करून तीन किंवा चार फ्लीक्स् कर्ल करावे. हे वळलेले केस चेहर्‍याच्या एका बाजूने सेट करावेत. उरलेल्या केसांचा एक छोटासा आंबाडा बांधावा.

कमी लांबीच्या केसांसाठी

ज्यांचे केस लहान आहेत त्यांनी शॉर्ट फ्रिंज आणि बँग्ज ही हेअरस्टाईल ठेवावी. कारण, या हेअरस्टाईलची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. तसेच हेअर कलरिंग हा पर्यायदेखील निवडता येऊ शकतो. यामध्ये मॅसी लूकदेखील खूप चांगला दिसतो. मॅसी हेअर बो बनवताना केसांना पिनांच्या साहाय्याने वरच्या बाजूने बांधावे. तसेच मॅसीनिकी पोनीदेखील आपल्याला बांधता येऊ शकते.

हेही वाचा;

Back to top button