योग आणि सौंदर्य | पुढारी

योग आणि सौंदर्य

सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लरपासून ते अनेक घरगुती उपायांचा वापर केला जातो. अनेक क्रीम्स, लोशन आणि ब्युटी टिप्सचा वापर करतात. या सर्वांबरोबरच काही सोपे उपायही लक्षात ठेवा.

चेहर्‍याच्या मेकअपपासून तर डोक्यावरील केस रंगविण्यासाठी अनेक कॉस्मेटिक्सचा वापर महिला करताना दिसत असतात. मात्र, यापासून मिळणारे सौंदर्य हे क्षणिक असते, हे त्या विसरतात. योगासन व निसर्गोपचार ही दोन साधने महिलांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी वरदान ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

आपल्या धावत्या जीवनातून दररोज 20—25 मिनिटे योगासनासाठी काढावीत. नियमित योगा केल्याने त्वचा सतेज तर होतेच शिवाय आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबीही कमी होते. योगाभ्यास केल्यानंतर ताठ उभे राहावे. आपल्या चेहरा दोन्ही हातांनी झाकून टाकावा. नंतर मोठ्याने श्वास घ्यावा. त्यानंतर डोक्याला चांगला मसाज करावा. हाच क्रम तीन वेळा करावा. याबरोबर कपालभाती व अनुलोम विलोम केल्याने अधिक लाभ होतो.

काही महिलांची मान ही प्रमाणापेक्षा जास्त जाड असते. ही जाडी कमी करण्यासाठी दोन्ही पाय जवळ करून उभे राहावे. चेहरा वरच्या बाजूने जितका नेता येईल तितका न्यावा. काही काळ अशाच स्थितीत ठेवून नंतर मान हळूहळू खाली आणून हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करावा. नंतर ताठ उभे राहून खांदे न हलवता डोके दोन्ही बाजूस हलवावे. हे आसन किमान 20 वेळा करावे.

थोडे पाय पसरवून उभे राहावे. हात कमरेवर ठेवावे. श्वास जोरात घ्यावा व जोरातच सोडावा. ही कसरत किमान 40 वेळा करावी. हळूहळू त्यात वाढ करून 100 पर्यंत करता येईल. पाय पुढे सरकवून खाली बसावे. दोन्ही हात समान वर उचला व खाली आणा. सुरुवातीला ही कसरत 50 वेळा करावी.

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पाय पसरवून उभे राहा. गुडघ्यात न वाकता पायाची बोटे हाताच्या बोटांनी पकडण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला ते जमणार नाही. परंतु, नियमित केल्याने ते शक्य होईल. दररोज हे आसन 10 वेळा करावे.

पाय दोन फुटांपर्यंत पसरवून शरीराला पुढच्या बाजूला 90 अंशांच्या कोनात झुकवा. उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. नंतर डाव्या हाताच्या बोटाने उजव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया 20 वेळा करा. मन शांत असेल, तरच तन सुंदर राहते. मनात भीती असेल, तर ती आपल्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवते. आपला चेहरा ओढला जातो. अनुलोम विलोम, कपालभाती तसेच श्वासाची कसरत केल्याने मनाचे सौंदर्यही अबाधित राहते. (आरोग्य )

हेही वाचा : 

Back to top button