‘फ्रुटफूल’ सौंदर्य : 'या' फळांचा उपयोग सौंदर्य वृद्धीसाठी केल्‍यास सौंदर्यात पडेल अधिकच भर | पुढारी

‘फ्रुटफूल’ सौंदर्य : 'या' फळांचा उपयोग सौंदर्य वृद्धीसाठी केल्‍यास सौंदर्यात पडेल अधिकच भर

आपल्या देशात सहज उपलब्ध असणार्‍या आणि मुबलक प्रमाणात मिळणार्‍या फळांचा उपयोग सौंदर्य वृद्धीसाठी केल्यास सौंदर्यात अधिकच भर पडते.

आंबा : यात अ, ब व क ही तीन जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात. प्रकृतीस हा उष्ण असल्याने खाण्याआधी काही काळ थंड पाण्यात बुडवून मग खावा. उन्हाळ्यातील उष्म्याच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी कच्चे पन्हे प्यावे किंवा ताज्या आंब्याच्या गरचा मँगो मिल्क शेक करून प्यावा. चेहर्‍याची त्वचा उजळावी, यासाठी आंब्याचा गर, हळद दुधात एकत्र मिक्स करून चेहर्‍यावर चोळावा. कैरी उकडून त्याचा गर चेहरा, गळा व मान यावर चोळून घ्यावा व मग वाळल्यावर धुवावे. त्वचा मुलायम व कांतिमान बनेल.

डाळिंब : डाळिंबाचे सौंदर्यवृद्धीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहर्‍यावर नियमितपणे चोळल्यास त्वचेचा रंग हलका व गुलबट होण्यास मदत होतो. याचा प्रयोग ओठांवरही करावा. ओठांचा रंग सुधारण्यास मदत होईल. चेहर्‍यावरील डाग आणि झाकोळलेपणा घालविण्यासाठी डाळिंबांची स्वच्छ धुतलेली साल कच्च्या दुधात वाटा व चेहरा, मान, गळा यावर लेप द्या. वाळल्यावर किंवा पंधरा मिनिटांनी धुवा. सकाळी उठल्या उठल्या नियमितपणे रसाळ असे डाळिंबांचे दाणे चावून खा. त्यामुळे कोठा साफ होतो. पोटातील जंतही पडतील व त्वचा उजळेल.

पपई : पुरातन काळापासून पिकलेल्या पपईचा गर हा एक प्राकृतिक आणि उपयुक्त सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरतात. कारण, यात अ, ब, क ही जीवनसत्त्वे भरपूर असतात. तसेच यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस कार्बोहायडटस् इ.चे प्रमाणही अधिक असते. याचा गर जर नियमितपणे चेहर्‍यावर चोळला, तर त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यावरील डाग, पुरळ इ. कमी होतात. चेहरा व अन्य ठिकाणी मस असेल, तर त्यावर कच्च्या पपईचा गर चोळून लावावा. नियमितपणे केल्यास मस जाऊ शकतील.

– जान्हवी शिरोडकर

Back to top button