पावसाळ्यात घराची देखभाल करायला हवी. पावसाळ्यात लाकडी फर्निचर आणि दरवाजे खिडक्या यांची देखभाल करणे आवश्यक असते. कारण पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगतात, त्यांचा आकार, रंग खराब होतात. पावसाळ्यात घराची योग्य काळजी न घेतल्यास पावसाळा खूप अडचणीचा ठरतो. पावसाळ्यात उन्हाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कपड्यांना वास येतो, कपाटातील कपड्यांना बुरशी चढते. त्यामुळे पावसाळ्यातही कपडे, फर्निचर, वस्तू योग्य राहाव्या असे वाटत असेल तर थोडी तयारी करावी लागते.
फर्निचरची देखभाल : या हवेत लाकडी फर्निचर फुगते. त्यांच्या आकारात बदल होतो. तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होतो. फर्निचर पुसताना ओल्या कापडाने न पुसता स्वच्छ मऊसर कोरड्या फडक्याने पुसावे. लॅमिनेटेड फर्निचर जसे स्टडी डेस्क, कपाट, शटर किंवा दार साफ करण्यासाठी साबण आणि पाणी यांचा वापर करावा. अर्थात कपाट पुसल्यानंतर ते पूर्ण कोरडे झाल्यानंतर त्यात कपडे ठेवावेत. कडुनिंबाची सुकलेली पाने कपाटात घालावीत.
कारपेट आणि रग्ज : पावसाळ्यात कारपेट आणि रग्ज वर वाईट परिणाम होतो. पावसाळ्यात खिडक्या उघड्या ठेवू नका. त्यामुळे हवेतला दमटपणा कारपेटमध्ये शोषला जातो. अशी ओलसर कार्पेटस बुरशीला आमंत्रण देतात. तसेच कारपेटवर ओल्या चपला, बूट आणू नये. ओलसरपणा राहू नये, यासाठी पंखा लावावा. कारपेट व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करावे. खूप उंची आणि जड कारपेटस् या वातावरणात वापरू नये. पर्यावरणपूरक कार्पेटस् वापरू शकतो. त्यांची खूप जास्त देखभालही करावी लागत नाही.
ओल : पावसाळ्यात अनेकदा भिंती, छत यांच्यावर ओल येते. भिंत किंवा छताला भेगा पडल्या असतील, खिडक्या चांगल्या नसतील तर भिंतींवर परिणाम होतो. त्यामुळे रंगाचे पोपडे उडतात. हल्ली ज्या रंगाचा वापर केला जातो ते रंग लवकर ओल पकडतात त्यामुळे त्याचे पोपडे निघतात. आरसीसी बांधकाम असले तरीही छतामध्ये पाणी शिरू शकते. त्यामुळे पावसाळा येण्यापूर्वी संपूर्ण घराच्या भिंती तपासाव्यात तसेच पाईप आणि नळ्या यांची स्वच्छता देखभाल करावी.
सोफ्याची स्वच्छता : पावसाळ्याच्या दिवसात सोफे व्हॅक्यूम क्लिनरने साफ करावेत. व्हॅक्यूम क्लिनिंग करताना क्लिनरमधून गरम हवा येईल याकडे लक्ष द्यावे. तसेच कोपर्यांमध्ये नॅफ्थालिन बॉल्स टाकावे.