रागाचा स्त्रियांच्‍या मनासह शरीरावरही हाेताे दुष्परिणाम, रागावर नियंत्रणासाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय | पुढारी

रागाचा स्त्रियांच्‍या मनासह शरीरावरही हाेताे दुष्परिणाम, रागावर नियंत्रणासाठी 'हे' आहेत सोपे उपाय

राग आणि स्त्रिया यांचं काहीतरी वेगळंच नातं आहे. पुरुषांसारखा त्यांचा राग प्रक्षोभ करणारा क्वचितच असतो; पण मनाला मात्र त्यामुळे फार मोठा भुंगा लागतो. एखाद्या गोष्टीचा मनाला राग आला की स्त्रिया त्या बोलून दाखवत नाहीत; पण त्याचा परिणाम त्यांच्या मनावर आणि शरीरावरही होत असतो. या रागाचं करायचं काय, असाही प्रश्न अनेकजणींना पडत असेल. बरेचदा आपण विनाकारण रागावतो असंही जाणवतं; पण तेव्हा रागावर नियंत्रण ठेवणं जड जातं. अशावेळी काही उपाय तुम्ही करून पाहायला हरकत नाही. त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला मदत होईल. ( Anger Management )

Anger Management : शांत राहण्‍याचा प्रयत्न करा

राग व्यवस्थापनाचं पहिलं सूत्र आहे की तुम्हाला राग येत असल्याची जाणीव झाली की शांत राहण्याचा अटोकाट प्रयत्न करा, हे जमायला वेळ लागेल; पण सुरुवातीला राग येतोय हे कळलं तरी त्याला आवर घालायला सुरुवात करता येईल. एका डायरीत रोज आज कोणत्या प्रसंगात मला राग आला आणि तो काबूत ठेवण्यासाठी मी काय केलं याची नोंद करा. नियमित नोंद केल्याने त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल. राग येऊ लागल्यावर आपल्या मनाला शांत राहण्याचा आदेश द्या. सुरुवातीला हे हास्यास्पद वाटेल; पण नंतर तुमचं मन तुमच्या सूचना ऐकू लागल्याचं तुम्हाला जाणवेल.

गार पाणी प्‍या

गार पाणी पिल्याने राग शांत होतो म्हणतात ते अगदी बरोबर आहे. थंड पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि रागाची तीव्रताही. आकडे मोजण्याची जुनी पद्धतीही मदतगार आहे. आकडे मोजल्याने मेंदूला रागाचं कारण विसरायला मदत होते. काही जणांना आकडे मोजल्याचा फायदा होत नाही, त्यांनी लक्ष दुसरीकडे वळेल अशी कोणतीही गोष्ट करायला हरकत नाही.

Anger Management : बोलण्यावर नियंत्रण ठेवा

राग आला की सगळ्यात मोठा धोका असतो तो आपण काय बोलतो यावर आपलं नियंत्रण राहत नाही याचा. तोंडून गेलेले शब्द तीराचं काम करत असतात, त्यामुळे राग आला तरी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शारीरिक हालचालींवरही नियंत्रण ठेवा. त्यातून कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घ्या.

विषयांतर होणार नाही याची काळजी घ्या.

कोणत्या कारणासाठी राग आला आहे हे लक्षात ठेवून विषयांतर होणार नाही याची काळजी घ्या. जुन्या गोष्टी उकरून काढून त्यावर बोलण्याने विषय वेगळ्या मार्गावर जातो. त्यामुळे रागात भरच पडते. राग येणं ही स्वाभाविक असलं तरी त्यावर नियंत्रण ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे नाहीतर त्याचा परिणाम तुमच्या स्वास्थावर होणार हे नक्की.

हेही वाचा : 

Back to top button