दै.’पुढारी कस्तुरी क्लब’ आयोजित : 'माझ्या आईचं पत्र सापडलं' स्पर्धेला कस्तुरींचा उदंड प्रतिसाद | पुढारी

दै.’पुढारी कस्तुरी क्लब’ आयोजित : 'माझ्या आईचं पत्र सापडलं' स्पर्धेला कस्तुरींचा उदंड प्रतिसाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भावनिक पत्रांमधून व्यक्त झालेले आईचे महत्त्व….गाण्यांमधून- नृत्यातून मुलांनी व्यक्त केलेले आईविषयीचे प्रेम….माय-लेकरांनी सादर केलेल्या नृत्य-गाण्यांना मिळालेली दिलखुलास दाद आणि आईप्रती भावना व्यक्त करत मुलांनी आईला केलेला सलाम…अशा पद्धतीने आईचे आयुष्यातील महत्त्व ‘आई – एक सर्वश्रेष्ठ नातं!’ या बहारदार कार्यक्रमातून उलगडले.

आई हा जगातला सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने आणि सेन्को गोल्ड प्रस्तुत जागतिक मातृदिनानिमित्त ‘माझ्या आईचं पत्र सापडलं! ’ या पत्रलेखन स्पर्धेसह ‘आई-एक सर्वश्रेष्ठ नातं!’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मुलांनी पत्रांमधून आईविषयीच्या भावनेला मोकळी वाट करून दिली. तर आईंनीही मुलांसोबत नृत्य, गाणी आणि अभिनयातून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मातृदिन साजरा केला.

पुढारी कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संपूर्ण कार्यक्रम आईला केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आला आणि त्यात आईंसह मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतला. कस्तुरी क्लबतर्फे मातृदिनानिमित्त ‘माझ्या आईचं पत्र सापडलं!’ ही पत्रलेखन स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती. त्यातील विविध पत्रांचे वाचन कार्यक्रमात करण्यात आले आणि पत्रांमधून भावना व्यक्त होत असताना सभागृहातील प्रत्येकाचे डोळेही पाणावल.

कारण त्यातून मुलांनी जीवनातील आईचे महत्त्व अधोरिखित केले आणि भावना व्यक्त केल्या, आठवणींना उजाळा दिला. तर पत्रांच्या वाचनानंतर आई – एक सर्वश्रेष्ठ नातं! हा माय-लेकरांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर झाला. त्यात आईंसह मुलांनी गाणी, नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून आपल्या आईबद्दलच्या भावनांना वाट करून दिली. अनेकविध कलाकृतींमधून भारावलेल्या वातावरणात मातृदिन उत्साहात साजरा झाला. हा कार्यक्रम सादर होत असताना चित्रकार अनिता सावंत- देशपांडे यांच्या कुंचल्यातून विविध रंगांची उधळण करत आई आणि मुली असे चित्र साकारले. कार्यक्रमामध्ये आई आणि मुलांनी- मुलींनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या, ते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

माय-लेकरांच्या सादरीकरणाला दाद!

कोणी नृत्यातून आईंच्या योगदानाला सलाम केला तर काहींनी सुरेल गाण्यांमधून आईंविषयीचे प्रेम बोलके केले. तर काहींनी अभिनयाच्या छटा दाखवत आईचा जीवनातील संघर्ष बोलका केला. एक आई, पत्नी, सून अशा महिलेच्या आयुष्यातील विविध भूमिका या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आल्या. माय-लेकरांच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. एकूणच या बहारदार कार्यक्रमाने अनेकांची मने जिंकली आणि अनेकांना आपल्या आईंची आठवणही करून दिली.

पाणावलेले डोळे अन् कृतज्ञता

जागतिक मातृदिनानिमित्त घेतलेल्या पत्रलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडोंच्या संख्येने पत्रे दै. ‘पुढारी’च्या पुणे शहर व पिंपरी – चिंचवड तसेच कस्तुरी विभागप्रमुखांकडे पोहोचली होती. त्यातील काही पत्रांचे वाचन कार्यक्रमात करण्यात आले. अतिशय सुंदर आणि कल्पकतेने कस्तुरी सदस्यांनी कार्यक्रमात पत्रे वाचली आणि त्याची सुरेख मांडणी करीत आईंविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

हातात पत्र आणि पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकांनी पत्र वाचून आईला सलाम केला. सेन्को गोल्ड अँड डायमंडचे रिजनल मॅनेजर संजय हुंजे आणि स्टोअर मॅनेजर ओंकार पैठणकर यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. निवडक तीन पत्रांना सेन्को गोल्डकडून बक्षिसे देण्यात आली. ‘देवमाणूस’ फेम सरू आजी असलेल्या अभिनेत्री रुक्मिणी सुतार याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्यांच्या येण्याने कार्यक्रमाला चारचाँद लागले.

बालक आणि पालक यांचा सुरेख संगम पाहिला. पत्रांची संकल्पना अतिशय कल्पक होती. यातच सारे भावविश्व आपले सामावले असे वाटले. मला कार्यक्रमात चित्र रेखाटायला मिळाले, यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबचे खूप आभार.

                                            अनिता सावंत-देशपांडे, चित्रकार

66 ‘आई एक सर्वश्रेष्ठ नातं’ हा आई-मुलगी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम बघताना भावूक झालो. अतिशय सुंदर सादरीकरण आणि कस्तुरी क्लब सभासदांचा जोशपूर्ण प्रतिसाद व नेटके नियोजन पाहता भविष्यात पुढारी कस्तुरी क्लबसोबत आम्ही असू.

                         संजय हुंजे, रिजनल मॅनेजर, सेन्को गोल्ड अँड डायमंड

66 दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबने घेतलेल्या माझ्या आईचं पत्र ही संकल्पना मला खूपच आवडली. माझं शूटिंग रद्द करून मी या कार्यक्रमाला आले. खूपच सुंदर कार्यक्रम झाला.

                        रुक्मिणी सुतार, अभिनेत्री ( ‘देवमाणूस’ मालिका),

Back to top button