

"If aliens exist, why don't they come to Earth? Scientists have unraveled the universe's greatest mystery!"
पुढारी ऑनलाईन : या विश्वाच्या पसाऱ्यात फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे असे म्हणणे थोडे धाडसाचे होईल. कारण या अथांग ब्रम्हांडात असे अनेक ग्रह, तारे आणि खगोलीय अविष्कार आहेत जिथे अजुनही मनुष्य पोहचू शकलेला नाही. त्यामुळे आपल्यासारखेच कोणीतरी असेल यावर अनेक वैज्ञानिकांचा विश्वास आहे.
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की इतक्या विशाल ब्रह्मांडात इतर कोणत्याही ग्रहावर जीवन नाही, असे ठामपणे म्हणता येत नाही. मात्र, एलियन अस्तित्वात असल्याचे ठोस आणि निर्विवाद पुरावे आजपर्यंत मिळालेले नाहीत. तसेच, जर एलियन मानवांपेक्षा अधिक प्रगत असतील, तर ते पृथ्वीवर का येतील, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
एलियनचा विषय निघताच लोकांच्या मनात कुतूहल आणि रोमांच निर्माण होतो. पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवन असू शकते का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. एलियनबाबत अनेक दावे करण्यात आले असले, तरी आजपर्यंत एकही असा पुरावा समोर आलेला नाही की ज्यामुळे त्यांचे अस्तित्व १०० टक्के सिद्ध होईल.
अलीकडेच अमेरिकन सरकारने १९४० पासून आजपर्यंत नोंदवलेल्या अनआयडेंटिफाइड एनोमलस फिनॉमेना (UAPs) यांची माहिती प्रसिद्ध केली होती. तसेच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणांमध्ये सुमारे एक-तृतीयांश लोकांचा एलियनच्या अस्तित्वावर विश्वास असल्याचे समोर आले. पण जर एलियन असतील, तर आपण त्यांना पाहू का शकत नाही? यामागे वैज्ञानिक अनेक कारणे सांगतात.
आपल्या कल्पनेपलीकडचे ब्रह्मांड
तज्ज्ञांच्या मते, ब्रह्मांडाची व्याप्ती आपल्या कल्पनेपलीकडची आहे. त्याची नेमकी सीमा काय आहे, हेही अद्याप निश्चितपणे माहीत नाही. सूर्याशिवाय पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंटॉरी आहे. तो पृथ्वीपासून सुमारे ४० ट्रिलियन किलोमीटर दूर आहे. ही दूरी पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतरापेक्षा सुमारे २६,८०० पट जास्त आहे. प्रकाशालाही ते अंतर पार करण्यासाठी ४.३ वर्षे लागतात.
प्रकाशाचा वेग सुमारे ३ लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. यावरून त्या अंतराची कल्पना करता येते. सध्या मानवाने प्रकाशाच्या वेगाच्या केवळ ०.०६४ टक्के वेगापर्यंतच तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपल्या अंतराळयानांचा कमाल वेग सुमारे १९१ किलोमीटर प्रति सेकंद आहे. अशा वेगाने प्रॉक्सिमा सेंटॉरीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ६,६५० वर्षे लागतील. तोपर्यंत पृथ्वीवर अनेक युगे बदलून जातील.
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की इतर ताऱ्यांच्या ग्रहांवर जीवन असले, तरी तिथे पोहोचणे सध्या जवळपास अशक्य आहे. अर्थात, त्या संस्कृतीचे तंत्रज्ञान किती प्रगत आहे यावर ते पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात की नाही, हे अवलंबून आहे. पण जर ते इतके विकसित असतील, तर त्यांना पृथ्वीवर येण्याची गरज तरी काय असेल?
वेळेवर होणारा परिणाम
अंतराळ प्रवासात वेळेचाही महत्त्वाचा परिणाम होतो. पृथ्वीपासून दूर आणि अधिक वेगाने प्रवास केल्यास त्या व्यक्तीसाठी वेळ तुलनेने हळूहळू पुढे सरकतो. याचे उदाहरण म्हणजे नासाचे अंतराळवीर स्कॉट केली. ते एक वर्ष आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्यानंतर, त्यांच्या जुळ्या भावापेक्षा काही मिलीसेकंदांनी "तरुण" असल्याचे आढळले.
अंतराळ प्रवासासाठी प्रचंड ऊर्जेची गरज
प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारे अंतराळयान तयार करायचे असेल, तर त्यासाठी अफाट ऊर्जेची आवश्यकता भासेल. ही ऊर्जा कुठून मिळवायची, हाही मोठा प्रश्न आहे.
तसेच, अंतराळ पूर्णपणे रिकामे नाही. त्यात हायड्रोजनसह विविध वायूंचे अणू विखुरलेले असतात. प्रकाशाच्या वेगाने धावणाऱ्या वस्तूला हे अणू धडकले, तर प्रचंड उष्णता निर्माण होऊ शकते आणि अंतराळयानाला स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो.
भौतिकशास्त्रज्ञ मिगेल अल्कुबिएरे यांच्या मते, इतकी प्रचंड ऊर्जा खर्च करून एलियन पृथ्वीवर का येतील? त्यांना आवश्यक असलेल्या बहुतांश गोष्टी त्यांच्या स्वतःच्या ग्रहावरच निर्माण करता येत असतील.
पृथ्वीचे जैवमंडळ
वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीचे जैवमंडळ पृथ्वीवरील सजीवांसाठी अनुकूल आहे. मात्र, इतर ग्रहांवरील जीवांसाठी ते तितकेच अनुकूल असेलच असे नाही.
सुमारे २.४ अब्ज वर्षांपूर्वी सायनोबॅक्टेरियाने ऑक्सिजन निर्माण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पृथ्वीवरील जीवनाचा विकास वेगाने झाला. त्यामुळे ऑक्सिजन आपल्यासाठी प्राणवायू बनला. पण एलियन जीवांसाठी ऑक्सिजन आवश्यकच असेल, असे नाही.
अशा परिस्थितीत ते पृथ्वीवर आले, तर त्यांना विशेष स्पेससूटची आवश्यकता भासू शकते. मात्र, लोकांनी आतापर्यंत सांगितलेल्या कथित एलियन भेटींच्या वर्णनांमध्ये स्पेससूटचा उल्लेख जवळजवळ आढळत नाही.
एलियनबाबत अद्याप ठोस पुरावे नाहीत
आजपर्यंत सुमारे ४,७०० हून अधिक सौरमालांमध्ये ६,२०० पेक्षा जास्त ग्रहांचा शोध लागला आहे. यापैकी अनेक ताऱ्यांभोवती किमान एक ग्रह आहे. आपल्या आकाशगंगा (मिल्की वे) मध्येच १०० अब्जांहून अधिक तारे असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ग्रहांची एकूण संख्या मोजणेही कठीण आहे.
विशेष म्हणजे, जेव्हा अंतराळविज्ञानाशी संबंधित तंत्रज्ञान कमी विकसित होते, तेव्हा एलियनविषयीच्या कथा आणि दावे अधिक ऐकायला मिळत होते. मात्र आज अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही, एलियन पृथ्वीवर येतात किंवा त्यांचे अस्तित्व निश्चितपणे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.