Bhindi: भेंडीच्या भाजीत दही कधी आणि कसे टाकावे?

अनेकदा भेंडीच्या भाजीचा पोत बिघडतो. या समस्येवर एक सोपा आणि प्रभावी तोडगा एका दक्षिण भारतीय महिलेने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.
Bhindi
Bhindifile photo
Published on
Updated on

Dahi bhindi fry secret trick

भेंडीची भाजी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा पदार्थ. कुरकुरी भेंडी, मसाला भेंडी किंवा साधी फ्राय भेंडी, नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. मात्र, भेंडी करताना गृहिणींसमोर सर्वात मोठी समस्या असते, ती म्हणजे भेंडीचा चिकटपणा. भाजी चिरताना आणि शिजवताना सुटणाऱ्या या चिकट द्रवामुळे अनेकदा भाजीचा पोत बिघडतो. या समस्येवर एक सोपा आणि प्रभावी तोडगा एका दक्षिण भारतीय महिलेने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

सोशल मीडियावर स्वयंपाकाचे विविध कसब शेअर करणाऱ्या एका महिलेने, भेंडीची भाजी करताना त्यात दही घालण्याची जुनी पारंपरिक युक्ती सांगितली आहे. हा केवळ चव वाढवण्याचा प्रकार नसून, यामागे एक अचूक वैज्ञानिक कारण दडले आहे. भेंडीमध्ये 'म्युसिलेज' नावाचा एक नैसर्गिक, घट्ट आणि चिकट द्रव असतो. भेंडी चिरल्यावर किंवा शिजवताना हा द्रव बाहेर येतो. भेंडी फ्राय करताना त्यात थोडे ताजे दही घातल्यास, दह्यामध्ये असलेले ॲसिड या चिकट द्रवाशी प्रक्रिया करते. ॲसिडच्या संपर्कात येताच भेंडीचा चिकटपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि भाजी मोकळी होते.

Bhindi
Chinese Bhel Recipe: बाहेरची चायनीज भेळ विसरा! घरच्या घरी बनवा १४ ग्रॅम प्रोटीन असलेली ही स्पेशल रेसिपी; वजनही वाढणार नाही!

चवीला मिळेल 'खास' तडका

दही घालण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे यामुळे भाजीला एक अप्रतिम चव मिळते. दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आंबटपणासाठी चिंच किंवा दह्याचा सर्रास वापर केला जातो. भेंडी फ्राय करताना दही व्यवस्थित परतले गेल्यावर भाजीला एक हलका, मखमली आणि चटपटीत स्वाद येतो. हा स्वाद मसाल्यांचा तिखटपणा संतुलित करतो, ज्यामुळे भाजी अत्यंत चवदार बनते.

भेंडीचा हिरवा रंग राहील कायम

अनेकदा कढईत भेंडी जास्त वेळ परतल्याने तिचा रंग काळा किंवा गडद तपकिरी पडतो, ज्यामुळे भाजी दिसायला आकर्षक वाटत नाही. मात्र, दह्याच्या आम्लयुक्त गुणधर्मामुळे भेंडीचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो. परिणामी, शिजल्यानंतरही भाजी हॉटेलसारखी अगदी ताजी आणि हिरवीगार दिसते.

कमी तेलात चमचमीत भाजी

भेंडीचा चिकटपणा घालवण्यासाठी अनेक जण ती जास्त तेलात डीप फ्राय करतात, ज्यामुळे भाजी आरोग्यासाठी अनहेल्दी बनते. पण या दाक्षिणात्य युक्तीमुळे जास्त तेलाची गरज भासत नाही. अवघ्या एक-दोन चमचे तेलात मोहरी, कढीपत्ता घालून भेंडी परतावी आणि त्यात थोडे दही घालावे. दही भेंडीला कढईच्या तळाशी चिकटू देत नाही, ज्यामुळे कमी तेलातही सुकी भाजी उत्कृष्ट बनते.

भेंडीमध्ये दही कधी घालावे?

भेंडीमध्ये दही घालण्याचा एक विशिष्ट नियम आहे. भेंडी कढईत टाकल्या-टाकल्या लगेच दही घालू नये. आधी भेंडी तेल आणि मसाल्यांसोबत मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे हलकी परतून घ्यावी. भेंडी अर्धी शिजल्यावर गॅसची आच मंद करावी आणि त्यात एक ते दोन चमचे चांगले फेटलेले दही घालावे. दही घातल्यानंतर भाजी एक मिनिट सतत ढवळत राहावी, जेणेकरून दही फाटणार नाही. यानंतर भेंडी कुरकुरी होईपर्यंत शिजवावी.

हा कोणताही आधुनिक प्रयोग नसून, आजी-पणजीच्या काळापासून चालत आलेली ही एक पारंपरिक युक्ती आहे. जुन्या पिढीकडे प्रत्येक भाजी शिजवण्यामागे एक उत्तम वैज्ञानिक तर्क असायचा. दक्षिण भारतात घरोघरी 'बेंडाकाया फ्राय' (भेंडी फ्राय) बनवण्याची ही पद्धत आहे.

Bhindi
Panipuri Water Recipe : पाणीपुरीचे ‘चटपटीत पाणी’ बनवायचेय? फॉलो करा ही सीक्रेट रेसिपी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news