

सध्याच्या जीवनशैलीत आरोग्य जपण्यासाठी सुपरफूड्स (Superfoods) चा समावेश आहारामध्ये करणे महत्त्वाचे झाले आहे. या सुपरफूड्सपैकी एक आहे मोरिंगा (Moringa) म्हणजेच शेवगा. शेवगाला आयुर्वेदात 'चमत्कारी वनस्पती' मानले जाते, कारण त्याचे प्रत्येक अंग,पाने, शेंगा, फुले, बिया मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. याच शेवग्याच्या पानांचे लोणचं (Moringa Leaves Pickle) सध्या केवळ चवीमुळेच नव्हे, तर आरोग्यदायी गुणधर्मांमुळे प्रचंड लोकप्रिय होत आहे.
सर्दीच्या दिवसांत बनवले जाणारे शेवग्याच्या पानांचे लोणचे केवळ तोंडाला चव आणते असे नाही, तर शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवते. मोरिंगाच्या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन A, C, आणि E यांचे प्रमाण भरपूर असते. या घटकांमुळे हे लोणचं शरीरासाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही.
मोरिंगाच्या पानांचे लोणचं नियमितपणे खाण्याचे अनेक फायदे आहेत:
हाडे मजबूत होतात: मोरिंगाच्या पानांमध्ये दुधापेक्षा अधिक कॅल्शियम (Calcium) असते. हे लोणचं खाल्ल्याने हाडांची घनता वाढते आणि हाडे अधिक मजबूत होतात. सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
इम्युनिटी बूस्टर: व्हिटॅमिन 'C' आणि 'A' मुबलक असल्याने, मोरिंगाचे लोणचं रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवते. यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो.
पचनक्रिया सुधारते: लोणच्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि फायबर (Fiber) असल्यामुळे पचन सुधारते. तसेच, यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पोटातील संसर्गापासून बचाव करतात आणि शरीर डिटॉक्स (Detox) करण्यास मदत करतात.
ॲनिमियावर रामबाण: मोरिंगाच्या पानांमध्ये लोह (Iron) मोठ्या प्रमाणात असते. नियमित सेवनाने रक्ताची कमतरता (ॲनिमिया) दूर होण्यास मदत मिळते.
पोषक तत्वांचा उत्तम स्रोत: मोरिंगाला 'सुपरफूड' असेच म्हटले जाते. या लोणच्यामुळे शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रथिने सहज मिळतात.
हे लोणचं बनवण्यासाठी बाजारातील शेवग्याच्या कोवळ्या पानांचा वापर केला जातो.
लागणारे साहित्य:
शेवग्याची कोवळी पाने (स्वच्छ धुतलेली व कोरडी केलेली) - 1 कप
लोणच्याचा मसाला (मेथी, बडीशेप, मोहरी, हळद, लाल तिखट यांचा भाजलेला व कुटलेला मसाला)
मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल - 1/2 कप
मीठ - चवीनुसार
हिंग - चिमूटभर
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर - 2-3 चमचे (लोणचं मुरण्यासाठी)
कृती:
सर्वात आधी शेवग्याची पाने चांगली धुऊन, पूर्णपणे कोरडी करून घ्या. पानात ओलावा राहिल्यास लोणचं लवकर खराब होऊ शकते.
एका कढईत तेल गरम करून ते थंड करा.
एका मोठ्या भांड्यात कोरडी पाने घ्या. त्यात लोणच्याचा मसाला, मीठ, हिंग आणि लिंबाचा रस घाला.
या मिश्रणात थंड केलेले तेल मिसळा आणि सर्व मिश्रण चांगले एकजीव करा.
हे लोणचं एका स्वच्छ आणि निर्जंतुक (Sterilized) काचेच्या बरणीत भरून ठेवा.
2-3 दिवस लोणचं मुरल्यावर ते खाण्यासाठी तयार होते.
शेवग्याच्या पानांचे हे खास लोणचं केवळ स्वादिष्टच नाही, तर ते तुमच्या दैनंदिन आरोग्यासाठी एक उत्तम टॉनिक आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता आणि ताकद देण्यासाठी याचा नियमित वापर करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आजच ही स्पेशल रेसिपी करून पाहा आणि तुमच्या आहारात या चमत्कारी सुपरफूडचा समावेश करा.