

भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक मौल्यवान धातू म्हणून नव्हे, तर बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्वाचे माध्यम म्हणून पाहिले जाते. सण-समारंभांमध्ये किंवा शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, सोन्याची खरेदी करताना ते खरे आणि शुद्ध (चोख) आहे की नाही हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा बनावट किंवा कमी शुद्धतेचे सोने विकून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
शुद्ध सोन्याची ओळख कशी करावी, यासाठी केंद्र सरकारने BIS हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. सोने खरेदी करताना ग्राहकांनी कोणती माहिती घ्यावी आणि कोणती काळजी घ्यावी, याबद्दलची सविस्तर माहिती वाचा
सोन्याची शुद्धता कॅरेट (Karat - K) मध्ये मोजली जाते. कॅरेटवरून सोन्यामध्ये सोन्याचे प्रमाण किती आहे, हे कळते:
24 कॅरेट: हे सोने सर्वात शुद्ध मानले जाते (99.9 टक्के शुद्धता). मात्र, ते अतिशय मऊ असल्याने याचे दागिने बनवले जात नाहीत. हे सहसा सोन्याच्या नाण्यांमध्ये, बिस्किटांमध्ये (Bars) किंवा वळ्यासाठी वापरले जाते.
22 कॅरेट: दागिन्यांसाठी हे सोने सर्वाधिक वापरले जाते. यात 91.6 टक्के सोने असते, आणि उर्वरित 8.4 टक्के ताकद येण्यासाठी तांबे किंवा चांदीसारखे इतर धातू मिसळलेले असतात.
18 कॅरेट: यात 75 टक्के सोने आणि 25 टक्के इतर धातू असतात. हे सोने अधिक टिकाऊ असते आणि हिऱ्याच्या दागिन्यांसाठी (Diamond Jewellery) वापरले जाते.
14 कॅरेट: यात 58.5 टक्के सोने असते.
भारतात सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही संस्था हॉलमार्किंग करते. हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेची सरकारी हमी आहे. 1 जुलै 2021पासून सोन्याच्या दागिन्यांवर सहा अंकी HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) क्रमांक असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हॉलमार्कचे 3 मुख्य घटक:
BIS लोगो भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह.
शुद्धतेची खूण कॅरेट आणि शुद्धतेचे प्रमाण दर्शवणारे आकडे.999(24K), 916(22K), 750(18K), 585(14K)
HUID क्रमांक सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड (उदा. A4B7R6), प्रत्येक दागिन्यासाठी वेगळा असतो.
HUID क्रमांक कसा तपासावा?
तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 'BIS Care App' डाउनलोड करू शकता.
या ॲपमधील 'Verify HUID' या पर्यायामध्ये दागिन्यावर दिलेला HUID क्रमांक टाका.
जर दागिना खरा असेल, तर तुम्हाला त्या दागिन्याची शुद्धता, वजन आणि हॉलमार्किंग केंद्राची माहिती त्वरित मिळेल. माहिती न मिळाल्यास, हॉलमार्क बनावट असू शकतो.
जरी अधिकृत शुद्धता तपासणी हॉलमार्कद्वारे होते, तरी घरी काही सोप्या पद्धतीने तुम्ही सोन्याची प्राथमिक तपासणी करू शकता:
पाण्याची चाचणी (Water Test): सोन्याचे दागिने एका बादलीतील पाण्यात टाका. शुद्ध सोने नेहमी बुडते आणि तळाशी स्थिर राहते, कारण त्याची घनता जास्त असते. जर दागिने पाण्यावर तरंगले किंवा पृष्ठभागावर राहिले, तर ते बनावट असण्याची शक्यता असते.
चुंबक चाचणी (Magnet Test): सोने हा धातू अ-चुंबकीय (Non-Magnetic) असतो. त्यामुळे सोन्याकडे चुंबक (Strong Magnet) आकर्षित होत नाही. जर चुंबकाने दागिना ओढला गेला, तर त्यात लोह (Iron) किंवा निकेल (Nickel) सारख्या धातूंची भेसळ आहे, असे समजावे.
दंश चाचणी (Bite Test): सोन्या हा मऊ धातू आहे. शुद्ध सोन्याचे नाणे किंवा बिस्कीट दातांनी हलके दाबल्यास त्यावर बारीक खूण (Mark) उमटते. मात्र, दागिन्यांमध्ये मिश्र धातू असल्याने ही चाचणी नेहमी विश्वसनीय नसते.
सोनं खरेदी करताना केवळ 'स्वस्त' किमतीकडे आकर्षित न होता, BIS हॉलमार्क आणि HUID क्रमांक आवर्जून तपासा. नेहमी विश्वासार्ह आणि परवानाधारक (Licensed) ज्वेलर्सकडूनच खरेदी करा. शुद्ध सोन्याची योग्य माहिती असल्यास तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता आणि तुमच्या बचतीचे संरक्षण करू शकता.