अशोक मोराळे, पुणे
वॉटर प्लांटच्या परिसरात नेहमीसारखी शांतता पसरलेली. मात्र, या शांततेच्या पडद्याआड मृत्यूचा सापळा विणला गेला होता. पाच लाखांची सुपारी, त्यातील दोन लाखांचा ॲडव्हान्स आणि एका व्यक्तीला संपवण्याचा गुप्त कट... मारेकऱ्यांनी प्लांटवर प्रवेश केला, नजरा लक्ष्याचा शोध घेत होत्या. काही क्षणांतच पिस्तुलातून गोळी झाडली गेली आणि रक्ताचा सडा पडला.
पण गोळी झाडल्यानंतर उघड झालेले सत्य कटापेक्षाही धक्कादायक होते. ज्याला संपवण्यासाठी मारेकरी आले होते, तो वॉटर प्लांटमालक नव्हताच! जमिनीच्या वादातून आखलेल्या हत्येच्या कटात एका निष्पाप कामगाराचा बळी गेला होता. मालकाच्या हत्येची सुपारी घेतली; पण मृत्यूच्या जबड्यात सापडला कामगार! सीसीटीव्हीच्या डोळ्यांत कैद झालेल्या हालचाली आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासाने अखेर या गूढ सुपारी हत्याकांडाचा पडदा उघडला.
कारेगाव येथील ‘समू इंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाणी प्लांटमध्ये २९ सप्टेंबर रोजी हा रक्तरंजित प्रकार घडला. हामजा उस्मान शेख (वय ३९) असे मृत कामगाराचे नाव. आरोपींना वॉटर प्लांटमालक विकास नवले यांचा खून करायचा होता; मात्र, चुकीच्या ओळखीमुळे शेख याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मृताची पत्नी अबिताबी यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सकाळचे सव्वासहा वाजले होते. नेहमीप्रमाणे हामजा हा मालक नवले यांच्या पाण्याच्या प्लँटवर कामाला गेला होता. पावणेसात वाजण्याच्या सुमारास शेजारी इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने अबिताबी यांना सांगितले, तुमचे पती पाण्याच्या प्लँटमध्ये पडले असून डोक्यातून रक्त येते आहे. त्यांनी प्लँटकडे धाव घेतली. लोकांची गर्दी जमलेली होती. हामजा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गर्दीतील एकाने सांगितले, थोड्या वेळापूर्वी फटाक्यासारखा मोठा आवाज झाला. पोलिस घटनास्थळी पोहोचले. हामजा याचा गोळी झाडून खून झाल्याचे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते. रांजणगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे पथक देखील या गुन्ह्याचा तपास करत होते.
तीन दिवसांनंतर त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढताना संतोष मांजरे हा उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समोर आले. तो सराईत गुन्हेगार होता. पोलिसांनी त्याचा माग काढत उत्तर प्रदेशातून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता हत्येमागील सुपारी आणि कटाचे धागेदोरे उलगडू लागले. पोलिस तपासानुसार, सार्थक कोहकडे याचा वॉटर प्लांटमालक विकास नवले यांच्याशी जमिनीवरून वाद होता.
याच वादातून त्याने तुषार तोडकर याच्यामार्फत संतोष मांजरे याला पाच लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी दोन लाख रुपये अगोदर देण्यात आले. त्यानंतर मांजरे याने पवन हुंडारे, पृथ्वी ऊर्फ भैया जाधव, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांच्या मदतीने हत्येचा कट आखला. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी मारेकरी प्लांटवर पोहोचले; मात्र लक्ष्य असलेल्या विकास नवले यांच्याऐवजी कामगार हामजा शेख यालाच त्यांनी मालक समजले. कोणतीही खातरजमा न करता त्याच्या डोक्यात गोळी झाडली.
पाच लाखांच्या सुपारीसाठी रचलेल्या कटात निष्पाप कामगाराचा बळी गेला. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम तसेच कर्मचारी शरद बांबळे, दीपक साबळे, संदीप फड आणि संकेत कवडे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला. जमिनीच्या वादातून सुरू झालेल्या या सुपारी कटाचा शेवट मात्र एका निष्पाप कामगाराच्या मृत्यूने झाला.