Ludo Online Scam : लुडोच्या आड सायबर सापळा

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘लुडो खेळा आणि पैसे जिंका’ अशा अनेक बनावट जाहिरातींचा सुळसुळाट सुरू आहे. ‘न्यू लुडो परिवार’सारखे अनेक बनावट ग्रुप्स सक्रिय
Ludo Online Scam
Ludo Online Scampudhari photo
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे, कोल्हापूर

लहानपणी घराघरांत खेळला जाणारा साधा ‘लुडो’चा खेळ आता कोट्यवधी रुपयांच्या सायबर लुटमारीचे अस्त्र बनेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘लुडो खेळा आणि पैसे जिंका’ अशा अनेक बनावट जाहिरातींचा सुळसुळाट सुरू आहे. ‘न्यू लुडो परिवार’सारखे अनेक बनावट ग्रुप्स सक्रिय झाले आहेत. ते तरुणाई आणि झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. ‘घरी बसल्या लुडो खेळा आणि अवघ्या काही तासांत तुमचे पैसे दुप्पट करा’, अशा आकर्षक दाव्यांनी भुलून शेकडो लोक या ग्रुप्समध्ये सामील होत आहेत.

या सापळ्याची सुरुवात अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने केली जाते. सुरुवातीला सहभागी होणाऱ्यांकडून यूपीआयद्वारे छोटी रक्कम घेतली जाते आणि पहिल्या काही डावांमध्ये चक्क त्यांच्या खात्यावर नफा म्हणून पैसे परत पाठवले जातात. हा परतावा पाहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत होतो आणि ते अधिक मोठी रक्कम डावावर लावू लागतात. मात्र, पडद्यामागे एक वेगळाच कट शिजत असतो.

Ludo Online Scam
Lawrence Bishnoi Gang : बिष्णाेई गँगची दहशत!

सायबर भामटे खेळाडूंकडून घेतलेल्या पैशांतून स्वतःचे बेकायदेशीर कमिशन कापून उरलेले पैसेच नफा म्हणून फिरवत राहतात. जेव्हा खेळाडू लाखो रुपये गुंतवतात, तेव्हा मात्र परताव्याची ही साखळी अचानक थांबवली जाते आणि कष्टाचे पैसे कायमचे अडकतात.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि केरळम्‌सह देशभरातील अनेक राज्यांत अशा प्रकारचा सायबर फ्रॉड सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. सायबर विश्वात या गुन्ह्याला ‘ऑनलाईन बेटिंग अँड टेलिग्राम पोंझी फ्रॉड’ असे म्हणतात. ज्यामध्ये सायबर भामटे मेसेजिंग ॲप्सवर बनावट ग्रुप्स तयार करून लुडोसारख्या प्रतिबंधित ऑनलाईन खेळांद्वारे अवघ्या काही तासांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवतात. पण जेव्हा लोक मोठी रक्कम गुंतवतात तेव्हा परतावा थांबवून संपूर्ण रक्कम हडप केली जाते.

Ludo Online Scam
Thane Crime : तेरा किलो गांजासह एकाला अटक

अशा आर्थिक लुटमारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सोशल मीडियावर झटपट नफा किंवा पैसे दुप्पट करून देणाऱ्या कोणत्याही बेटिंग ग्रुप्समध्ये सामील होऊ नका, ग्रुपमधील नफ्याच्या बनावट स्क्रीनशॉटस्‌वर विश्वास ठेवू नका आणि अनोळखी व्यक्तीच्या यूपीआय आयडी किंवा बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करणे टाळा. अशी फसवणूक झाल्यास एका सेकंदाचाही विलंब न लावता खाते गोठवण्यासाठी १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर कॉल करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.