

बदलापूर : ओडिशा राज्यातून गांजा आणून बदलापूर परिसरात विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या एका इसमाला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १३ किलो ४९७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची बाजारभावानुसार किंमत ३ लाख ३७ हजार ४२५ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत विशाल हा इसम बाहेरील राज्यातून गांजा आणून विक्रीसाठी साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन बांडे, पोलीस हवालदार गणेश गावडे, अमर कदम, प्रकाश पाटील, मंगेश जाधव, अशोक थोरवे, योगेश वाघ तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद तोंडलिकर, रामदास उगले आणि अविनाश पवार यांच्या पथकाने बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरात विशाल याचा शोध घेतला. तो आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान विशाल याने आपला साथीदार रजत याच्याकडून गांजा आणल्याची माहिती दिली.
दरम्यान हा गांजा त्याने राहत्या घराखालील सोसायटीच्या स्टोअर रूममध्ये लपवून ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तेथून १३.४९७ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.