Crime News | पॉलिटिकल मर्डर मिस्ट्री!

Crime News | ठाण्यातील 'उबाठा' पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गेल्या आठवड्यात गोळी झाडून आणि धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
Pradeep Purnekar Murder Case
Pradeep Purnekar Murder Case
Published on: 
Updated on: 

ठाण्यातील 'उबाठा' पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गेल्या आठवड्यात गोळी झाडून आणि धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आठवडा उलटूनदेखील पोलिस तपासातून हत्येमागील कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. राजकीय वाद, बिल्डर व ड्रग्ज लॉबी विरुद्ध उठवलेला आवाज, एका मुलीसह परिसरातील काही तरुणांच्या संशयास्पद हालचाली या सर्व दिशेने तपास वर्तुळाकार फिरतोय. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे....

Pradeep Purnekar Murder Case
Thane Palghar Drought: पालघर-ठाणे दुष्काळाच्या यादीबाहेर गेल्याने शेतकरीवर्ग चिंतेत

पॉलिटिकल मर्डर मिस्ट्री!

ठाण्यातील 'उबाठा' पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. २९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पूर्णेकर आपल्या कार्यालयात बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या पाच मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार व धारदार हत्याराने वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली.

या प्रकरणात पूर्णेकर यांचा जुना मित्र व घटनास्थळी उपस्थित असलेल्या पप्प्या शिंदे यास अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली. तर निखिल यादव आणि नितेश पवार या दोघा मारेकऱ्यांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील एका डेअरी फार्ममधून अटक केली आहे. दरम्यान, या घटनेतील तीन मारेकरी अटकेत असूनही पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करण्यात अद्याप यश आलेले नाही.

ठाण्यातील उबाठा पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांकडून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमण्यात आली असून, ठाणे गुन्हे शाखेची नऊ पथके या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. या गुन्ह्यात पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्प्या शिंदे यास पोलिसांनी घटनेच्या नंतर अवघ्या काही तासांत अटक केली होती. पूर्णेकरांवर हल्ला झाला त्यावेळी पप्प्या शिंदे त्यांच्याच कार्यालयात उपस्थित होता.

सात राऊंड फायर केल्यानंतर व धारदार हत्याराने वार झाल्यानंतरदेखील पूर्णेकरांसोबत उपस्थित असलेल्या पप्प्याला साधा खरचटलेदेखील कसे नाही, असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याचादेखील या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे समोर आले अन् पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.

त्याच्या चौकशीतून संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव आणि नितेश पवार या आणखी तीन मारेकऱ्यांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पप्प्याची कसून चौकशी केली असता काही जणांनी घटनेनंतर आरोपींना मदत केल्याचे समोर आले. तपास पथकांनी आरोपींना मदत करणाऱ्यांचा ठावठिकाणा शोधून तीन महिला व दोन पुरुषांना मीरा रोड येथून ताब्यात घेतले.

त्यात आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्लीच्या प्रेयसीचादेखील समावेश होता. घटनेनंतर टल्लीने फरार होण्यासाठी आपल्या प्रेयसीकडून आर्थिक मदत घेतली होती. ताब्यात घेतलेल्यांच्या चौकशीतून दोन आरोपी गोव्याला पळून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिस तातडीने आरोपींच्या मागावर निघाले व निखिल यादव आणि नितेश पवार या दोघा मारेकऱ्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा जवळच्या एका डेअरीमधून अटक करण्यात आली.

हत्येच्या घटनेतील तीन मारेकरी अटकेत आल्याने या घटनेचा उलगडा होईल, असे वाटत असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली. पूर्णेकर यांच्या हत्येच्या कटात एकूण पाच जणांचा समावेश होता. त्यापैकी एक जण आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली सोबत मोटरसायकलवर हेल्मेट घालून आला होता.

हा हेल्मेटधारी कोण होता याची माहिती इतर आरोपींनादेखील नव्हती. त्यामुळे तीन मुख्य आरोपी अटकेत असूनही या पाचव्या आरोपीची ओळख अद्यापदेखील पटलेली नाही. हा हेल्मेटधारी व्यक्ती सगळ्या प्लॅनिंगवर देखरेख ठेवण्यासाठी आरोपींसोबत आला होता, असा पोलिसांना संशय आहे. हा हेल्मेटधारी आणि या कटातला आरोपी संतोष कनोजिया अद्यापदेखील फरार आहेत.

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट सुमारे महिनाभरापूर्वीच रचला गेला होता, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. आरोपींनी हत्येच्या कटाची संपूर्ण योजना पूर्वनियोजितपणे आखली होती. त्यासाठी आरोपींनी पिस्तूल, हत्यार व वाहनांची जमवाजमव केली. हत्येत वापरण्यात आलेली एक दुचाकी आरोपींनी काही दिवसांपूर्वीच २५ हजारात खरेदी केली होती. तर एक दुचाकी एका आरोपीच्या मैत्रिणीची होती.

हत्या केल्यानंतर फरार होण्यासाठी एका अल्टो कारचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती व ही अल्टो कार पप्प्या शिंदेने आपल्या मित्राकडून विकत घेतली होती, अशी माहिती पोलिस तपासातून निष्पन्न झाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या दुचाकी समतानगर भागात सोडून दिल्या होत्या व कार मधून पळून गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात त्यांनी एका तरुणीवर संशय व्यक्त केला आहे.

अमली पदार्थाच्या आहारी गेलेली परिसरातील एक तरुणी दोन तरुणांसोबत काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांनी या तरुणीस व दोघा तरुणांना पकडून कापूरबावडी पोलिसांच्या हवाली केले होते. त्यानंतर ही तरुणी वारंवार पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या परिसरात फिरत होती.

हत्येच्या घटनेच्या दिवशीदेखील ही तरुणी याच परिसरात फिरत होती, असे निष्पन्न झाले आहे. या आरोपांनंतर आता पोलिस त्या तरुणीचीदेखील सखोल चौकशी करीत आहेत. एकूणच या हत्या प्रकरणात अनेक संशयास्पद बाबी समोर येत असून, पोलिस सर्व दिशेने तपास करीत आहेत.

Pradeep Purnekar Murder Case
Thane News: पूर्णेकर हत्येनंतर ठाण्यात राजकीय रणशिंग! ‘भयमुक्त ठाणे’साठी ९ ऑक्टोबरला महामोर्चा

हत्येचे गूढ कायम:

प्रदीप पूर्णेकर हत्याकांड नेमके कोणत्या कारणातून घडवले गेले हे गूढ आठवडा उलटल्यानंतरदेखील कायम आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचे नाव या गुन्ह्याच्या 'एफआयआर'मध्ये आले आहे.

तर ठाण्यातील एका बिल्डरवरदेखील संशयाची सुई स्थिरावत आहे. या बिल्डरच्या गैरकारभाराविरोधात पूर्णेकर यांनी आवाज उठवला होता. तसेच ड्रग्ज माफियांच्या विरोधातदेखील पूर्णेकर सतत आवाज उठवत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news